विरोधकांची ‘चिमणी’ रामराजेंच्या अंगणात फुसकी!

By Admin | Updated: October 20, 2014 21:36 IST2014-10-20T21:36:20+5:302014-10-20T21:36:20+5:30

फलटण : राष्ट्रवादीचा सलग पाचव्यांदा वर्चस्व

Opposition's 'chimney' fits in the yard of Ramrajya! | विरोधकांची ‘चिमणी’ रामराजेंच्या अंगणात फुसकी!

विरोधकांची ‘चिमणी’ रामराजेंच्या अंगणात फुसकी!

नसीर शिकलगार- फलटण  -विरोधकामधील दुही, दुष्काळी पट्ट्यात आलेले पाणी, माझ्या विकासकामांना व कष्टाला साथ द्या, असे रामराजेंनी केलेले भावनिक आवाहन याला साथ देत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा राष्ट्रवादीला साथ देत रामराजेंवरील विश्वास व्यक्त केला आहे.
फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक चव्हाण हे दुसऱ्यांदा निवडून आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग पाचव्यांदा या मतदारसंघावर वर्चस्व राखले आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक सत्ताधारी व विरोधकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व अस्तित्व ठरविणारी होती. मागील दोन वर्षांपासून विरोधकांनी चांगलेच रान पेटवित विधानसभा ताब्यात घेण्याची चांगली तयारी केली होती. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी असल्याने व फलटण मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटणीला आल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिगंबर आगवणे यांना स्वाभिमानीत पाठविले होते. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत उभे असताना त्यांना काँग्रेसच्या नेतेमंडळींबरोबरच त्यांच्या आक्रमक आंदोलनाला फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी साथ देत मताधिक्य दिले होते. या मतदारसंघावर रामराजेंच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतानाही विरोधी उमेदवार खोतांना मिळालेल्या मताधिक्यामुळे विरोधकांनी विधानसभेला चांगला जोर लावला होता. दिगंबर आगवणे यांचे सामाजिक योगदान मोठे असल्याने व नवीन नेतृत्व असल्याने मतदारांचा चांगला प्रतिसादही त्यांना मिळत होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी व महायुती फुटल्याने एकास एक लढत देण्याचे विरोधकांचे स्वप्न भंगले. राष्ट्रीय काँग्रेसकडे आगवणेंसारखा दुसरा सक्षम उमेदवार नसल्याने पुन्हा स्वाभिमानीतून काँग्रेसमध्ये आगवणेंचा प्रवेश करून त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली.
आगवणेंची कोलांटउडी अनेक मतदारांना पसंत पडली नाही. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उभी फूट पडून माजी आमदार चिमणराव कदम यांनीही सवतासुभा मांडीत स्वाभिमानीतून त्यांचे कार्यकर्ते पोपटराव काकडे यांना उमेदवारी मिळवून देताना प्रचार केला. शिवसेनेने डॉ. नंदकुमार तासगावकर यांना उमेदवारी दिली. चौरंगी लढतीचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले. त्याचबरोबर आत्तापर्यंत प्रत्येक निवडणूक पाणी व रोजगाराच्या प्रश्नावरच लढविल्या गेल्यात.
वीस वर्षांहून अधिक काळ सत्ता कायम ठेवणारे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अशक्यप्राय धोम-बलकवडी व नीरा-देवघर धरणांची कामे कशी केली, कृष्णेचे पाणी मोठ्या प्रयत्नाने व युक्तीने कसे तालुक्यात आणले, त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमध्ये कमिन्ससारखा मोठा उद्योग कसा आणला, तालुक्यातील श्रीराम सह. साखर कारखाना कसा वाचविला, यावर प्रचारात भर देताना माझे काय चुकले म्हणून लोकसभेला कमी मताधिक्य दिले. मी तुम्हाला नको आहे का? असे भावनिक आवाहन केले. या आवाहनाला व रामराजेंच्या विकासकामांना जनतेने साथ दिल्याचे मतांच्या आकडेवारून स्पष्ट दिसून आले.

विरोधी मतांचे विभाजन
धोम-बलकवडीचे कालव्याद्वारे काही दुष्काळी गावात आलेल्या पाण्यामुळेही व इतर ठिकाणी पाणी येण्याच्या अपेक्षेने दुष्काळी भागानेही साथ दिल्याचे दिसून आले. रामराजेंसोबत त्यांचे दोन्ही बंधू, भगिनी, पुत्र यांनीही प्रचाराची धुरा सांभाळताना रामराजेंवरील ताण कमी केला. राष्ट्रवादीची प्रचारयंत्रणा प्रत्येक घराघरात पोहोचली. याउलट विरोधकांना वेळ कमी भेटल्यामुळे घराघरांपर्यंत पोहोचता न आल्याने व विरोधी मताचे विभाजन झाल्याने विजयासमीप पोहोचता आले नाही. फक्त नेहमी राष्ट्रवादीला ४२ हजारांच्या घरात मिळणारे मताधिक्य ३४ हजारांपर्यंत कमी करण्यात दिगंबर आगवणेंना यश आले. त्याचप्रमाणे प्रभावी विरोधक म्हणून आगवणेंना स्वीकारल्याचे त्यांना झालेल्या मतदानाद्वारे दिसून आले.

जिंकल्याचे कारण$$्निरामराजेंच्या पाठबळावर दीपक चव्हाण यांनी दुसऱ्यांदा यश मिळविले. मतदार संघात मोठ्या प्रमाणावर केलेली विकास कामे त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली.

Web Title: Opposition's 'chimney' fits in the yard of Ramrajya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.