ताईगडेवाडी गावठाण हस्तांतरणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:34+5:302021-03-09T04:41:34+5:30
जनजागरण आक्रमक : धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित सणबूर : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न प्रलंबित ठेवून ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित ...

ताईगडेवाडी गावठाण हस्तांतरणाला विरोध
जनजागरण आक्रमक : धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित
सणबूर : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न प्रलंबित ठेवून ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणाचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील जनजागरण प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे दिला आहे.
मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ताईगडेवाडी येथे गावठाण विकसित करण्यात आले आहे. तेथे धरणग्रस्तांच्या शेतजमिनीसह नागरी सुविधांच्या संदर्भातील प्रश्न शिल्लक असतानाही गावठाणाचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांनी त्याला विरोध दर्शविला आहे. नुकत्याच तेथे झालेल्या पाटबंधारेसह विविध विभागांच्या बैठकीतही याप्रश्नी वातावरण तापले होते. गावठाण हस्तांतरण करण्यापूर्वी पुनर्वसनाचा विषय संपलाय का, याची खात्री करणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेने एकदा गावठाण हस्तांतरण करून जबाबदारीतून सुटका करून घेतली तर धरणग्रस्तांनी प्रलंबित प्रश्नी कशी आणि कोणाकडे दाद मागायची? ताईगडेवाडी येथील गावठाणातील धरणग्रस्तांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा असून यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी चुकीचे पाऊल उचलल्यास तीव्र संघर्ष करू, असे जनजागरणचे जितेंद्र पाटील, सुनील पवार, आनंदा मोहिते आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.