सत्ताधारी झाले विरोधक... अन् विरोधक आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:45+5:302021-02-06T05:15:45+5:30

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या ...

Opposition came to power ... and opponents rejoiced | सत्ताधारी झाले विरोधक... अन् विरोधक आनंदले

सत्ताधारी झाले विरोधक... अन् विरोधक आनंदले

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेची लाईनच चुकली. सभागृहात झालेल्या आरोप प्रत्यारोपावर सभागृहातच चर्चा झाली पाहिजे. पण, स्वत:ला तज्ज्ञ म्हणविणाऱ्या अनेकांना याचा विसरच पडलेला दिसतोय. साप साप म्हणून भुई धोपटणाऱ्यांना आपला माणूसच फुटल्याचा साक्षात्कार झाला. पण, त्यानिमित्ताने प्रशासनातील कोणी दोषी असेल तर त्यालाही शोधले पाहिजे, असे वाटले नाही. मग, ही सर्वांचीच मिलिभगत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो.

कोरोनाच्या काळात केल्या गेलेल्या खरेदीबाबत नगरसेवक आण्णा लेवे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. प्रशासनातील चुकीच्या कामाबाबत हा आक्षेप होता. पालिकेत काही चुकीचे चालले असेल तर त्याबाबत विचारणा करण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे. तोही सत्ताधारी हिरावून घेणार आहेत का, असा प्रश्न पडतो आहे. कोणी काहीही विचारायचे नाही. जे चालले आहे ते खूप चांगले चालले आहे, असाच सर्वांचा समज झालेला दिसतोय. विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच बजावली. त्यामुळे पार्टीविरोधी काम झाल्याचा शोध काहींनी लावला आहे. उलट पार्टीची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न होता, हे दिसलेले नाही.

सभागृहात हे सर्व झालेले असताना त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहार करून नगराध्यक्षांनाही बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. नगराध्यक्षांनी सभागृहातच या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित होते. त्यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहाराचीही गरज नव्हती. पण, खासदार उदयनराजेंच्या कानी लागणाऱ्यांनी डाव साधलेला आहे. एका बाजूला नगराध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आण्णा लेवे दोघांनाही शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकेकाला बाजूला करण्याचा प्रयत्न असल्याचेच दिसते. पण, यामुळे पार्टीची अडचण होणार हेदेखील समजून घेतले पाहिजे. आण्णांच्या जवळच्या लोकांना टेंडर मिळाले नाही. त्यामुळे आण्णांनी प्रशासनाला धारेवर धरले, असे म्हटले असले तरी याच नगरपालिकेत लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. हेदेखील विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रशासनावर कोणाचा तरी वचक असला पाहिजे, अशी भावना दिसते. त्यातून पार्टीला बदनाम करण्याचा उद्देश वाटत नाही. पण, तसा समज करून देण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र दिसते.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टी मजबूत करण्यासाठी अनेकांची गरज लागते. सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले तर पुढच्यांना संधी मिळत नाही. मात्र, आत्ताच फाटाफूट व्हायला लागली तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक चुकीचे काम होऊच नये, हा प्रत्येक नगरसेवकाचा दंडक असलाच पाहिजे. त्याशिवाय प्रशासनावर वचक राहात नाही. विद्यमान मुख्याधिकारीदेखील सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांचाही कोणावर रोष नाही. अशा परिस्थितीत कोणावरही वैयक्तिक आरोप करत बसण्यापेक्षा सध्याच्या स्थितीत जास्तीत जास्त कामे करून सातारकरांना एका चांगल्या शहरात राहण्याचा आनंद देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात साताऱ्यात समाविष्ट होणाऱ्या भागालाही हेच समाधान मिळाले पाहिजे.

आण्णा तुमचे चुकलेच...

नगरपालिकेत होत असलेल्या कामाबाबत सभागृहात प्रश्न विचारणे, ही काय कामाची पद्धत झाली का... तुम्ही त्यांना वैयक्तिक विचारले असते तर दोघांचाही फायदा झाला असता. त्यामुळे सभागृहात प्रश्न विचारून आण्णा हे तुम्ही काय साध्य केले. वैयक्तिक टीका आणि पार्टीचा दोष... त्यामुळे तुमचे हे चुकलेच.

Web Title: Opposition came to power ... and opponents rejoiced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.