नेमबाजीत करिअर करण्याची संधी
By Admin | Updated: November 5, 2014 23:43 IST2014-11-05T21:31:16+5:302014-11-05T23:43:09+5:30
तेजस्विनी सावंत : खेळाडूंशी साधला संवाद

नेमबाजीत करिअर करण्याची संधी
सातारा : ‘नेमबाजीत करिअर करण्यासाठी साताऱ्यात चांगले वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा. अडचणींवर मात करून या खेळात यश मिळवा,’ असे मत वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी सावंत यांनी व्यक्त केले.
येथील शिवराज ससे अॅकॅडमीत तेजस्विनीने येथील खेळाडूंशी संवाद साधला. शिवराज ससे याने उभारलेली शूटिंग रेंज सातारा शहर व परिसरातील खेळाडूंना खरोखरच पर्वणी ठरेल, अशी सर्व सुविधांनियुक्त अशी ही रेंज असून, या रेंजमध्ये मला ही सराव करायला आवडेल व मी माझ्या मोकळ्या वेळेत नक्कीच याठिकाणी सराव करण्यास येईन, असेही तेजस्विनी म्हणाली. तेजस्विनीने तिचे अनुभव खेळाडूंशी शेअर केले. तसेच खेळाडूंना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धेपूर्वी कशा प्रकारची तयारी असावी, याबद्दल विशेष माहिती दिली. शिवराज ससे हा स्वत: बालेवाडी येथे प्रशिक्षण व सराव करत असून, तो आपल्या देशासाठी चांगले नेमबाज तयार होण्यासाठी शहरातील खेळाडूंना घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल त्याचे कौतुक केले. दरम्यान, यावेळी कविता चोरगे, चारुशीला ससे यांनी तेजस्विनी सावंत हिचे मोगऱ्याचे रोप, सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले.
यावेळी बालाजी चॅरिटेबलचे संस्थापक राजेंद्र चोरगे, अध्यक्ष धनंजय थोरात, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव संजय कदम, नितीन माने, उदय गुजर, जगदीश खंडेलवाल, राजूशेठ खंडेलवाल, हणमंत ससे, राजीव निकम, साधना ससे, सुनीता पाटील व खेळाडू उपस्थित होते.
बेळगाव येथील १९ मराठा इन्फंट्री मिलिटरी प्रशिक्षण केंद्रातील शूटिंग या खेळाचे प्रशिक्षक दळवी यांनीसुध्दा नुकतीच भेट देऊन १७ ते १९ वयोगटांतील जो खेळाडू ६०० पैकी ५४५ एवढा स्कोअर करेल त्याला भरती करून घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)