पाण्याचे भांडवल करण्याचा विरोधकांचा खटाटोप

By Admin | Updated: January 25, 2015 00:40 IST2015-01-25T00:38:54+5:302015-01-25T00:40:11+5:30

जिहे-कठापूरचे पाणी पेटले : शशिकांत शिंदे यांचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र

Opponent Opposition to Make Water Capital | पाण्याचे भांडवल करण्याचा विरोधकांचा खटाटोप

पाण्याचे भांडवल करण्याचा विरोधकांचा खटाटोप

कोरेगाव : जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करुन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, त्याप्रमाणे काम पूर्णत्वाकडे गेले, ही वस्तुस्थिती आहे. तरीही पालकमंत्री आणि काही लोकप्रतिनिधी या योजनेचे राजकीय भांडवल करू पाहत आहेत, हे दुर्दैवी आहे. विकासाला आमचे सहकार्य आहे, मात्र त्यातून कोणी राजकीय स्वार्थ साधू पाहत असेल, तर कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार शशिकांत शिंंदे यांनी विरोधकांना दिला.
कोरेगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, ‘१९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली ही योजना कागदावरच होती, मात्र दुष्काळी भागाचा शिक्का पुसण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली ही योजना गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाला निधीची तरतूद करणे भाग पडले. नेर तलावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे होते, प्रत्यक्षात मात्र पाणी येण्यापूर्वीच खटाव आणि माण तालुक्यातील कामे अगोदरच उरकण्यात आली. कोणातरी नेत्याच्या नावाचा जोगवा मागत आपण काही तरी करत आहोत, असे दाखविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला, त्याचा फायदा या योजनेसाठी झाला नाही,’ असा आरोप आ. शिंंदे यांनी केला. जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी असताना या योजनेला सर्वोच्च प्राधान्य दिले. कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेसाठी निधीची तरतूद करावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, योजनेसाठी नेमलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या समितीने निष्कारण त्रुटी काढण्यामध्ये वेळ घालविल्याने ही योजना काही अंशी रखडली, अन्यथा निवडणुकीपूर्वीच नेरमध्ये या योजनेचे पाणी पोहोचले असते, असेही आ. शिंंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे अध्यादेश हा एकच निकष लावल्याने ही योजना रखडत गेली, मात्र निवडणुकीपूर्वी निधी दिला. त्यातून काही साध्य झाले नाही. अनेक महिने वाया गेले आणि योजना गतीने पूर्ण झाली नाही. उलट योजनेच्या खर्चात वाढ झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गवगवा करण्याची
सवय नाही
कोरेगावातून आमदार झाल्यानंतर वसना-वांगणा योजना मार्गी लावल्या. जलसंपदा मंत्रिपद मिळाल्यानंतर योजना पूर्ण केल्या. या योजनांबाबत कोण बोलत नाही, मात्र श्रेयवादासाठी आणि आपण स्वत कसे मोठे आहोत, हे दाखविण्यासाठी काही जणांचा जिहे-कठापूर योजनेसाठी जप चालू आहे. आम्ही विकासकामांसाठी झगडतो, दिवस रात्र एक करतो, मात्र गव गवा करत नाही, काही जणांचे राजकारण या गवगव्यावर अवलंबून असल्याने ते पोपटपंछी करत आहेत, असा आरोप आ. शिंदे यांनी केला.
...खटावमधून पाणी पुढे नेऊ देणार नाही
माझ्या मंत्रिपदाच्या अगोदरच जिहे-कठापूर योजना मंजूर झाली आहे. या योजनेतून दुष्काळी खटाव तालुक्यातील मोळ, डिस्कळ, ललगुण व निढळ परिसरातील अनेक गावे वगळण्यात आली आहेत. या गावांचा योजनेत समावेश व्हावा, यासाठी शासनाकडे मागणी केली असून, पाठपुरावा देखील सुरु आहे. या गावांचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही योजनेचे पाणी खटाव तालुक्यातून पुढे जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी आम्ही जनआंदोलन छेडू, पण या गावांचा समावेश केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील पुरंदर योजना असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी तातडीने निधीची तरतूद केली. खासदार शरद पवार यांनी व्यक्तीश त्यामध्ये लक्ष घातले होते. ही योजना मार्गी लागणार असल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची जशी पुरंदर योजना आहे, तशीच आमची जिहे-कठापूर योजना आहे, त्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करत आहोत, दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरणारी योजना पूर्ण करणे, हे माझे कर्तव्य आहे, असेही आ. शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी श्रेयवाद न आणता विकासाभिमूख काम केल्यास आमची सहकार्याची भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Opponent Opposition to Make Water Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.