नवीन पालखीमार्गाचे उद्घाटन
By Admin | Updated: November 24, 2014 23:11 IST2014-11-24T21:59:48+5:302014-11-24T23:11:51+5:30
रथमार्गासाठी झाला २.२२ कोटी खर्च

नवीन पालखीमार्गाचे उद्घाटन
म्हसवड : म्हसवड नगरीतील श्री सिध्दनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. चालू वर्षी श्री सिध्दनाथाची ग्रामप्रदक्षिणा आ. जयकुमार गोरे व म्हसवड नगरपरिषदेच्या प्रयत्नातून २ कोटी, २२ लाखांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेल्या नूतन रथमार्गावरून झाल्याने कोणतीही अडचण आली नाही.
आजपर्यंत श्री सिध्दनाथाच्या रथाची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करताना मार्गात पाणी, चिखलाचा अडथळा होत होता. गेल्यावर्षी आमदार जयकुमार गोरे यांनी एका वर्षात रथमार्गाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांसमोर सोडला होता. एका वर्षात म्हसवड नगरपरिषदेच्या माध्यमातून २ कोटी, २२ लाखांचा निधी खर्चून रथमार्गाचे काम यात्रेपूर्वीच पूर्ण करण्यात आले. ३० मीटर रुंदीच्या प्रशस्त रस्त्यासाठी अडीच मीटर उंचीची संरक्षक भिंतही उभारण्यात आली. चालूवर्षी सिध्दनाथ रथाचे मार्गक्रमण याच मार्गावरून वेळेत आणि कोणतीही अडचण न येता पार पडले.
रथपूजनादिवशी सायंकाळी आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नूतन रथमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपसभापती अतुल जाधव, नगराध्यक्ष विजय सिन्हा, पक्षप्रतोद विजय धट, उपनगराध्यक्ष डॉ. मासाळ, दादासाहेब काळे, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी, मारुती वीरकर, निर्मला पिसे, रूपाली कोले, प्रतिभा लोखंडे, वैशाली लोखंडे, सुनीता डावकरे, रवींद्र वीरकर, अकील काझी, लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, म्हसवडकरांनी माझ्यावर व सहकाऱ्यांवर टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आम्ही विकासात्मक वाटचाल सुरू ठेवली आहे. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
नूतन रथमार्ग पूर्ण झाल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्यक्ष, त्यांचे सहकारी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. यात्रेकरूंसाठी पाणी, रस्ते, वीज, आदी सुविधा पुरविण्याला नगरपरिषदेने प्राधान्य दिले आहे.
नूतन रथमार्गाचे काम पूर्ण झाल्याबद्दल सिध्दनाथ भाविकांतर्फे आमदार जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)