विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी साताऱ्यात खुलं वाचनालय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:22 AM2017-11-13T11:22:43+5:302017-11-13T11:27:51+5:30

सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलने शाळेमध्येच खुलं वाचनालय सुरू केले आहे. या ठिकाणी टेबल ठेवण्यात आले असून, वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक, गोष्टींची पुस्तके ते वाचू शकतात. दिवसभर हे वाचनालय सुरू असून, हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

Opening the library for the intellectual development of the students! | विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी साताऱ्यात खुलं वाचनालय !

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी साताऱ्यात खुलं वाचनालय !

googlenewsNext
ठळक मुद्देअनंत इंग्लिश स्कूलमधील वाचनालय दिवसभर सुरू आदर्शवत उपक्रमास पालकाकडूनही पुस्तके भेट

सातारा , दि. १३ : विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, यासाठी येथील अनंत इंग्लिश स्कूलने शाळेमध्येच खुलं वाचनालय सुरू केले आहे. या ठिकाणी टेबल ठेवण्यात आले असून, वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक, गोष्टींची पुस्तके ते वाचू शकतात. दिवसभर हे वाचनालय सुरू असून, हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. तसेच या वाचनालयाला पालकांकडून पुस्तकेही भेट मिळत आहेत.


साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूलचा नावलौकिक आहे. शैक्षणिक क्षेत्रात या विद्यालयाने नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे. तसेच हे विद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. गेल्या एक महिन्यापासून या विद्यालयाने अनोखा व सर्वांना आदर्शवत असा उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे खुलं वाचनालय.

जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत असा सुरू होणारा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी सुटीच्या वेळेत कोठे भटकू नये, गोंधळ करू नये. त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना ज्ञान मिळावे या उद्देशाने हे खुलं वाचनालय सुरू केले आहे.


विद्यालयातच असणाऱ्या  मोकळ्या जागेत टेबल-खुर्ची ठेवण्यात आली आहे. तेथे बसून विद्यार्थ्यांनी वाचन करावे व आपल्या ज्ञानात भर घालावी हा उद्देश या मागे होता. हा उपक्रम सुरू करणे व यशस्वी करण्यामध्ये प्राचार्य एस. एम. शेख, उपप्राचार्य जे. एच. जाधव, पर्यवेक्षक जी. डी. गायकवाड, एस. जी. माने यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

पर्यवेक्षक व्ही. टी. सोनावणे या वाचनालयाचे सर्व कामकाज पाहतात. त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले आहे. वाचनालयाचा हा उद्देश पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण, मिळेल त्यावेळी विद्यार्थी मोबाईलपेक्षा हातात वर्तमानपत्र, साप्ताहिक, गोष्टीची पुस्तके, आत्मचरित्र घेऊन वाचन करीत असतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत हा उपक्रम सुरू असतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत झाली आहे.
 

विद्यार्थ्यांचा वेळ गोंधळ, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून खुल्या वाचनालयाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागला आहे. त्यांच्यात ज्ञानाची भर पडली आहे. विद्यार्थ्यांनी विश्वास संपादन केला असून, त्यांना नोंद न घेता पुस्तके वाचण्यासाठी देण्यात येत आहेत. या उपक्रमास विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही प्रतिसाद मिळत आहे.
- एस. एम. शेख,
प्राचार्य

Web Title: Opening the library for the intellectual development of the students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.