उघड्यावर कचरा टाकणे पडणार महागात!
By Admin | Updated: March 7, 2016 00:20 IST2016-03-06T21:04:25+5:302016-03-07T00:20:00+5:30
कऱ्हाड पालिका करणार कारवाई : पथक तयार; कचरा टाकणाऱ्यास एक हजाराचा दंड

उघड्यावर कचरा टाकणे पडणार महागात!
कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व एन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब, जिमखाना यांच्याप्रमाणे शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांच्या वतीने सध्या शहरात ‘पर्यावरण जनजागरण’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शहरातील स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती याबाबत खासकरून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शहरात काही अज्ञातांकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने अशांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
त्यामुळे येथून पुढे कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकण्यावर तयार करण्यात येणाऱ्या गुप्त पथकामार्फत नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
कऱ्हाड शहरात मोठ्या प्रमाणात सात प्रभागांतून कचरा गोळा केला जातो. तसेच तो कचरा हा बारा डबरी येथे टाकला जातो. सध्या दिवसाला चाळीस टन एवढा निर्माण होणारा कचरा हा मोठ्या प्रमाणात एकत्रित करून तो साठवला जात आहे. अशात शहरात उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यावर निर्बंधही घालणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
कऱ्हाड शहरात शनिवारी अज्ञातांकडून शहरातील रत्नकल्याण बिल्डिंग परिसरात रस्त्यावर कचरा टाकण्यात आला. या घडलेल्या प्रकारामुळे पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच पालिकेकडून शहरातील स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना उभारण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात होती. त्याचा विचार करत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तपासी पथक तयार केले जाणार असून, त्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
शनिवारी अज्ञातांकडून दुर्गंधीयुक्त कचरा टाकल्याची माहिती मुख्याधिकारी औंधकर यांना समजताच त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पंचनामा करत कचरा हटविला. मुख्याधिकारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सूचना देखील केल्या.
कऱ्हाड पालिकेत सध्या तीन दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा घेतली जात आहे. यामध्ये कचरा विभाजन व कचऱ्यांचे प्रकार या बरोबरच त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली जात आहे. अशात शहरात अशाप्रकारे अज्ञातांकडून कचरा टाकला गेल्याने या शिबिराचा नक्कीच उपयोग पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना होताना दिसून येत आहे.
शहरातील उघड्यावरील कचऱ्याच्या समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा आता समोर आला आहे. त्या प्रश्नावर उपाय म्हणून मुख्याधिकारी औंधकर यांनी आता उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तयार करण्यात येत असलेल्या गुप्त पथकामार्फत उघड्यावर टाकणाऱ्या व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पालिकेच्या कचरा कुंड्याव्यतिरिक्त उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपंचायती, नगरपरिषद आणि औद्योगिक नगरी अधिनियम १०६५ कलम २३१ नुसार कारवाई केली जाणार आहे. कचरा टाकण्यात आलेल्या व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्याकडून एक हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्यात येईल, अशी तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे.
स्वच्छ व सुंदर कऱ्हाडसाठी पालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. दररोज सकाळी व रात्री पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. त्यामुळे या शहर स्वच्छतेबाबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, तसेच उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळ्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
असे तयार करतात प्लास्टिक
प्लास्टिक तयार करताना काही रसायनांचा वापर केला जातो. प्लास्टिकमध्ये पॉलिइथेलिन, पालिव्हिनाइल क्लोराइड, पॉलिस्टेरीन, बेन्झीन, झायलीन या मुख्य रसायनांचा वापर प्लास्टिक तयार करताना केला जातो.
कऱ्हाडात दररोज ४० टन कचरा
कऱ्हाड शहरातून दररोज ४० टन कचरा पालिकेकडून एकत्रित केला जातो. या कचऱ्याचे प्रमाण महिन्याला एक हजार दोनशे टन एवढे असते. त्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्लास्टिकचेच प्रमाण जास्त
शहरातून एकत्र होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे सुमारे ७५ टक्के असते. यावरून शहरात एका दिवसाला गोळा होणारा ४० टन कचरा यामध्ये प्लास्टिक किती टनामध्ये गोळा केले जात असेल याविषयी संशोधन करणे गरजेचे आहे.
पालिका तसेच एन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब याबरोबर विविध सामाजिक संघटनांकडून सध्या ‘स्वच्छ व सुंदर कऱ्हाड’साठी प्रयत्न केले जात आहेत. कऱ्हाड जिमखान्याच्या ‘पर्यावरण जनजागरण’ अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिकेकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय हा खरोखरच चांगला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
- जालिंदर काशीद,
अध्यक्ष, एन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब, कऱ्हाड
पालिकेच्या वतीने शहरात पडणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या प्राथमिक पातळीवर सफाई कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. यानंतर शहरातील पेठांतर्गंत शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. नागरिकांनी पालिकेच्या या उपक्रमास सहकार्य करावे.
- विनायक औंधकर,
मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका