रिक्षाथांब्याच्या आडून ओपन-क्लोजचा मामला
By Admin | Updated: November 28, 2014 00:11 IST2014-11-27T22:23:16+5:302014-11-28T00:11:19+5:30
शनिवार चौक : स्थानिकांच्या डोकेदुखी पडलीय भर

रिक्षाथांब्याच्या आडून ओपन-क्लोजचा मामला
सातारा : येथील शनिवार चौकातील रिक्षाथांबामध्येच नव्याने मटका व्यवसाय सुरू झाला आहे. मध्यवस्तीतच असलेला हा अड्डा सामान्य नागरिकांचे डोकेदुखी बनला आहे. याविषयी कल्पना देऊन देखील पोलीस दुर्लक्ष करीत आहे. यामुळे क्लोज झालेला मटका आता ओपन होऊन बाजार चौकातच वसत आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ५०१ पाटीला ओळखले जाते. या चौकात अनेक व्यावसायिक व्यवसाय करतात. त्यामुळे सतत ग्राहकांची वर्दळ असते. मोक्याची बाजारपेठ म्हणून येथे रिक्षाथांबाही आहे. पाच रिक्षाथांबामध्ये सध्या हे मटकाला नवीन अड्डा सुरू झाला आहे. यामध्ये येणारे अनेक व्यक्ती मद्यपान करून येतात.
त्यामुळे त्यांच्यातील वाद-विवाद रस्त्यावर पोहोचत आहे. तर अनेक मद्यपी रस्त्यावर पडलेले असतात. यामुळे शहरात मुख्य बाजारपेठेतून हा अड्डा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही, पोलिसांना याविषयी कळवून देखील ते कारवाई करत नाही. पोलीस नजरेआड मटका व्यवसाय सुरू आहे. त्याची ऐवढी वाच्यता होत नाही; परंतु आता पोलिसांसमोर हा नवं व्यवसाय तोंड काढून उभा आहे. तरीसुद्धा पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
प्रार्थनास्थळाच्या दारातच मद्यपी
ज्याठिकाणी हा व्यवसाय सुरू झाला आहे. तो रिक्षास्टॉप आहे. त्याला लागूनच प्रार्थनास्थळ आहे. रात्री-अपरात्री याठिकाणी मद्यपी धिंगाणा घालतात. तर प्रार्थनास्थळाच्या दारातच पडून राहतात. त्यामुळे हा अड्डा येथून हलवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.