‘ओपन’ बिअर बार अखेर ‘क्लोज’!

By Admin | Updated: April 22, 2015 00:29 IST2015-04-21T22:46:24+5:302015-04-22T00:29:51+5:30

टेरेसला ठोकले टाळे : आगरप्रमुखांकडून गंभीर दखल; स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांना लावणार कामाला--लोकमतचा दणका

'Open' beer bar finally 'close'! | ‘ओपन’ बिअर बार अखेर ‘क्लोज’!

‘ओपन’ बिअर बार अखेर ‘क्लोज’!

कऱ्हाड : हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या येथील बसस्थानक इमारतीच्या टेरेसवर दारूच्या बाटल्या रिचवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर बसस्थानक प्रशासन खडबडून जागे झाले. आगारप्रमुखांनी शटरला तातडीने टाळे ठोकून टेरेसकडे जाण्याचा मार्गच बंद केला. तसेच टेरेसची त्वरीत स्वच्छता करण्याची सुचनाही कर्मचाऱ्यांना दिली.सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कऱ्हाड बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. शेकडो एस. टी. येथून मार्गस्थ होतात. मात्र, तरीही आवश्यक सोयी-सुविधांची येथे वाणवा आहे. प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असते. आवारातील खड्ड्यांमुळे येथे लहानमोठे अपघात घडतात. त्यातच भरीस भर म्हणून बसस्थानकाची जिर्ण झालेली इमारत प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची स्थिती आहे. मात्र, असे असताना बसस्थानकात सर्वकाही अलबेल असल्याचे भासविले जाते.
वास्तविक, बसस्थानकाचे नुतनीकरण होणार असल्याने येथील व्यवस्थापनाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच येथील गैरप्रकारांना आळा घालण्यासही कोणी धजावत नसल्याची परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांच्या याच दुर्लक्षाचा काहीजणांकडून गैरफायदा घेतला जात होता. बसस्थानक इमारतीच्या टेरेसचा संबंधितांनी ‘बिअर बार’सारखा वापर सुरू केलेला. आवारात शेकडो प्रवासी असतानाही टेरेसवर मद्यपींची मैफल जमत होती. गत अनेक महिन्यांपासुन हा प्रकार सुरू होता. टेरेसवर बाटल्यांचा अक्षरश: खच पडलेला. मंगळवारी ‘लोकमत’ने मंगळवारी या प्रकाराचा भांडाफोड केला. ‘गर्दीतल्या दर्दींचा ओपन बिअर बार’ या मथळ्याखाली मंगळवारी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर शहरात खळबळ उडाली.
ज्याठिकाणी शेकडो प्रवासी असतात त्याठिकाणी असा प्रकार घडत असल्याचे पाहून नागरीकांसह प्रवाशांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बसस्थानक प्रशासनही खडबडून जागे झाले. त्यानंतर तातडीने कारवाई करत आगार प्रमुखांनी यात लक्ष घालूनन टेरेस पार्टी बंद करण्याच्या सुचना केल्या. (प्रतिनिधी)


कर्मचाऱ्यांनाही
आता ‘नो एन्ट्री’
आगारप्रमुख जे. के. पाटील यांनी मंगळवारी सकाळी तातडीने टेरेसची पाहणी केली. या प्रकाराची त्यांनी गांभिर्याने दखल घेतली. यापुढे कोणालाही टेरेसवर प्रवेश करता येणार नसल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना बजावून सांगितले. तसेच टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या शटरला कुलूप ठोकले. त्वरीत टेरेसची स्वच्छता करण्याची सुचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली.



टेरेसवर दारूच्या शेकडो रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, खाद्य पदार्थांच्या रिकाम्या पुड्या, जेवण आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिशव्या, पत्रावळ्या, द्रोण, स्नॅक्सच्या पुड्या, थंड पाण्याच्या बाटल्या, खराब झालेले खाद्यपदार्थ, सिगारेटची रिकामी पाकिटे त्याचबरोबर दारूच्या बाटल्यांचे रिकामे बॉक्सही बसस्थानकाच्या टेरेसवर आढळून आले आहेत.

Web Title: 'Open' beer bar finally 'close'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.