जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच ‘ओपन बार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:35+5:302021-09-02T05:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आदर्श कामकाज असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच्या लिफ्टसमोरील अडगळीत ‘ओपन बार’ सुरू असल्याचा धक्कादायक ...

जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच ‘ओपन बार’!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आदर्श कामकाज असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच्या लिफ्टसमोरील अडगळीत ‘ओपन बार’ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून, यामुळे प्रचंड खळबळ उडालीय. त्यातच दारूचे पेग रिचवल्यानंतर मोकळ्या झालेल्या बाटल्या अडगळीच्या आतील बाजुला बादलीतच व्यवस्थित ठेवून दिल्या जातात. विशेष म्हणजे याची कोणालाच कुणकुण कशी लागत नाही. याचे आश्चर्य व्यक्त होतंय.
सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकिक आहे. मागील २० वर्षांपासून जिल्हा परिषद राज्य नव्हे; तर देशपातळीवरही डंका वाजवत आहे. विविध अभियाने, योजना यांमध्ये सतत चढती कमान राहिली आहे. यामुळे परराज्यातील लोकप्रतिनिधी, संस्थाही जिल्हा परिषद तसेच सातारा जिल्ह्यात माहिती घेण्यासाठी येतात. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारीही जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहण्यासाठी योगदान देतात. पण, काही लोकांच्या अवगुणांमुळे कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रकार होतोय. आताही तसेच होऊ पाहात आहे. कारण, जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच ‘ओपन बार’ भरत आहे का ? असा प्रश्न पडत आहे. कारण, येथील अडगळीच्या आतील बाजूस सतत दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या परिसरात कधीही दारुची बाटली दिसून आली नाही. पण, जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरच दारुच्या बाटल्या सतत दिसून येतात. लिफ्टसमोर हिरकणी कक्ष आहे. या कक्षाच्या पश्चिम बाजूच्या मोकळ्या जागेत काही साहित्य टाकण्यात आलेले आहे. त्यातच आतील बाजूस बसण्यासाठी थोडी जागा आहे. दुपारच्या सुमारास या ठिकाणी अनेकजण बसलेले दिसून येतात. पण, त्यांच्याकडे कधीच कोणी गांभीर्याने पाहात नाही. अशाच वेळी गुपचूप तेथे मद्यप्राशनाचा कार्यक्रम उरकला जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर तेथेच बाटल्या टाकून दिल्या जातात. पण, हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. तरीही याबाबत कोणाला खबर कशी लागली नाही, हे एक कोडेच आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील या ‘ओपन बार’मध्ये कोण-कोण बसते. तेथे आणखी काय चालते का ? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. कारण, आदर्श असणाऱ्या जिल्हा परिषदेला गालबोट लावण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांचा बुरखा फाडण्याचीच वेळ आली आहे. तरच जिल्हा परिषदेचा आदर्श कायम टिकून राहील, हे निश्चतच.
चौकट :
बादलीत आढळतात बाटल्या
अनेकजण असू शकतात सामील...
अडगळीच्या आतील बाजूस काही बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. या बादल्यांमध्ये दारुच्या बाटल्या दिसून येतात. एक-दोनच्या संख्येने नाहीतर एकाचवेळी चार-पाचही बाटल्या दिसतात. त्यामुळे मद्यप्राशन करणारी व्यक्ती एक नाहीतर यामध्ये दोघे-तिघेजण सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोध घ्यायला गेले तर तो लगेच लागू शकतो. यासाठी जिल्हा परिषद हे प्रकरण किती मनावर घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
फोटो दि.३१सातारा झेडपी नावाने...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील अडगळीच्या ठिकाणी बादलीत दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत.
...................................................................