उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीच्या माठांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:25+5:302021-03-28T04:36:25+5:30
कुडाळ : सध्या सगळीकडेच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. भरदुपारी लोक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. उन्हाचे चटके बसू लागल्याने ...

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीच्या माठांना मागणी
कुडाळ : सध्या सगळीकडेच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. भरदुपारी लोक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. उन्हाचे चटके बसू लागल्याने गारव्यासाठी थंड पेयांची मागणी होत आहे. उसाच्या रसवंतीगृहाची किणकिण कानी पडू लागली आहे. अशातच घरोघरी थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज असणाऱ्या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे.
‘जुने ते सोने’ ही म्हण प्रचलित आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी मातीच्या माठातील पाण्यानेच तहान मिटते. उन्हाळ्यात तहान लागल्यावर थंड पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. यावेळी बहुतेकजण फ्रीजमधीलच पाणी पितात. मात्र, देशी फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या माठातील पाण्याची चवच काही निराळीच असते. माठातील पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते. यात अनेक रोगांशी लढण्याची ताकद असते. उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी फायदेशीर असते. तसेच मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. याचा आरोग्यासाठी चांगलाच फायदा होता. यामुळे आरोग्याचा विचार करून या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे.
चौकट :
विजेची ना झंजट
उन्हाळ्यात बऱ्याचदा वीजपुरवठा खंडित होतो. यावेळी तहान भागवण्यासाठी फ्रीजमधील थंड पाणी उपलब्ध होत नाही. तसेच याकरिता विजेचा खर्चही होतो. याउलट मातीचे माठ सच्छिद्र असल्याने यामध्ये नैसर्गिकरीत्या पाणी थंड होण्यास मदत होते. कोणताही खर्च न होता माठातील पाणी मिळते. त्यामुळे थंड पाण्यासाठी अतिशय स्वस्त, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी असा पर्याय मिळत आहे.