साताऱ्यात ओन्ली वन शिवेंद्रराजे
By Admin | Updated: October 20, 2014 00:38 IST2014-10-19T22:54:39+5:302014-10-20T00:38:41+5:30
गमती करणाऱ्यांनो आता माझ्याजवळ दगड

साताऱ्यात ओन्ली वन शिवेंद्रराजे
सातारा : मतविभागणीचे अंदाज फोल ठरवित राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तब्बल ९७ हजार ९६४ मते घेऊन सातारा-जावळीचा गड पुन्हा एकदा जिंकला. शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील दीपक पवार व दगडू सकपाळ हे मातब्बर उमेदवार जावळीतून जास्त मते घेतील, असा अंदाज बांधला गेला; मात्र झाले उलटेच. जावळीकरांच्या मनात शिवेंद्रसिंहराजेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी येथील शाहू स्टेडियममध्ये झाली. पहिल्या फेरीत जावळी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी पावणेनऊला पहिला निकाल हाती आला. या फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १ हजार १३९ इतके मताधिक्य घेतले. यानंतर लगोलग एका-एका फेरीचा निकाल हाती येऊ लागला. प्रत्येक फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य अधिक होत गेल्याने १७ व्या फेरीअखेर त्यांचा विजय निश्चित झाला होता. दुसऱ्या फेरीत २ हजार ५४४, तिसऱ्या फेरीत २ हजार ३६७, चौथ्या फेरीत १ हजार ५१४, पाचव्या फेरीत २ हजार ४0, सहाव्या फेरीत १ हजार ४९८, सातव्या फेरीत २0१४, आठव्या फेरीत १९९५, नवव्या फेरीत १७१0, दहाव्या फेरीत १८४९, अकराव्या फेरीत ३७0, बारावीत १४६६, तेरावीत २२0५, चौदावीत १८७७, पंधरावीत २४९७, सोळावीत २५९५, सतरावीत २२३ इतके एकूण ३१ हजार ७६६ इतके मोठे मताधिक्य शिवेंद्रसिंहराजेंनी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला. इथपर्यंतचे मतदान जावळी तालुक्यातील होते. जावळीकरांनी शिवेंद्रसिंहराजेंना भरभरून मते दिली. मात्र, सातारा शहरातच शिवेंद्रसिंहराजेंची पिछेहाट झाली. शाहूपुरीचा निम्मा भाग तसेच सातारा नगरपालिकेचा पूर्व व पश्चिम भागातूनही शिवेंद्रसिंहराजेंची पिछेहाट झाली. या ठिकाणी मतदारांचा कौल दीपक पवार यांच्या बाजूने लागला. १८, २२ व २३ व्या फेरीत तब्बल ६१५ मताधिक्य दीपक पवार यांच्या बाजूने वळले. या तीन फेऱ्यांचा अपवाद वगळता, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य वाढतच गेले. अखेरच्या ३१ व्या फेरीअखेर त्यांना तब्बल ४७ हजार ८१३ एवढे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळाले. दीपक पवार वगळता इतर सातही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेचे दगडू सकपाळांना २५ हजार ४२१ इतकी तर काँगे्रसच्या रजनी पवार यांना ७ हजार १८७ मते मिळाली. प्रत्येक फेरीत इतर उमेदवार दोन आकड्यांतच खेळत राहिले. मनसे, बसपा व महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते तीन आकड्यांच्यावर नाहीत. टपाली मतांतही शवेंद्रसिंहराजे भोसले
यांनीच आघाडी घेतली. त्यांना ७१४ मते मिळाली. दीपक पवार (२६९), दगडू सकपाळ (१२५), रजनी पवार (३३) इतकी मते मिळाली. १0५९ इतक्या टपाल मतांपैकी ८४ मते अवैध ठरली. सातारा-जावळी तालुक्यांतील २ हजार ३३३ मतदारांनी नोटाचे बटण दाबून आपली नाराजीही व्यक्त केली. (प्रतिनिधी)
सातारा-जावळीच्या विकासाला महत्त्व देणार
सातारा-जावळी तालुक्यांतील मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी झटून काम केले. त्यांचा मी ऋणी आहे. विकास काय असतो, हे पुढच्या काळात जनतेलाच दिसेलच.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी
गमती करणाऱ्यांनो आता माझ्याजवळ दगड
‘निवडणूक कालावधीत माझ्यासमवेत काम करून रात्री दुसऱ्याचा प्रचार करणारे काहीजण होते. वरून वेगळे आणि आतून त्यांच्या मनात काळेबेरे होते. मला या सर्व बाबी माहीत होत्या. मात्र, काही बोलता येत नव्हते, कारण मी उमेदवार होतो. ही निवडणूक माझी होती. काहीजणांनी ‘गमती’ केल्या. त्यांना माझे एवढेच सांगणे की, निवडणुकीत माझे हात दगडाखाली होते. आता दगड माझ्याजवळ आहे. एवढे त्यांनी लक्षात घ्यावे,’ असा खणखणीत इशारा सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधात काम करणाऱ्या निकटवर्तीयांना दिला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघाचा ३१ व्या फेरीअखेरचा निकाल जाहीर झाला आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शाहू क्रीडा संकुलात आगमन झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली.