जमीन एकच; विक्री मात्र दोनदा

By Admin | Updated: December 14, 2014 23:47 IST2014-12-14T22:25:50+5:302014-12-14T23:47:01+5:30

महाबळेश्वर : सात जणांविरोधात गुन्हा

The only land; Sell ​​only twice | जमीन एकच; विक्री मात्र दोनदा

जमीन एकच; विक्री मात्र दोनदा

महाबळेश्वर : एकाच जमिनीचे दोन व्यवहार करून फसवणूक केल्याचे प्रकरण येथे उडघकीस आले आहे. पुणे येथील स्वाती शाम काशीद या महिलेने जावली, ता. महाबळेश्वर येथील स.नं. मधील ११४ गुंठे जमीन खरेदी केली होती. काही दिवसांनी मुलांच्या मदतीने मूळ जमीन मालकाने जुलै महिन्यात ही ११४ गुंठे जमीन पुन्हा परस्पर विकली. या संदर्भात महिलेने सात जणांविरुध्द संगनमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
किल्ले प्रतापगडपासून जवळ असलेल्या जावली या गावातील ११४ गुंठे जमीन चिंचवड, पुणे येथील स्वाती शाम काशीद (वय ३७) यांनी मारुती तुकाराम कदम व तानाजी तुकाराम कदम (रा. दोघेही जावली) यांच्याकडून रीतसर खरेदी केली होती. या मिळकतीचा कब्जाही काशीद यांना देण्यात आला होता. ही बाब मारुती व तानाजी यांच्या मुलांनाही माहीत होती, असे असतानाही मारुती व तानाजी यांनी या जमिनीचे मुलांचे नावे बक्षीसपत्र केले. या बक्षीस पत्राची उतारी नोंद न करता तसेच वर्तमानपत्रात नोटीस न देता या महिलेने खरेदी केलेली ११४ गुंठे जमीन विजय लक्ष्मण उतेकर व तेजस विठ्ठल कासुर्डे यांना परस्पर विकण्यात आली. संबंधित महिला जेव्हा गावाकडे आली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार माहीत झाला.
महिलेने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात येऊन या प्रकाराबाबत तक्रार नोंद केली. तक्रारीनुसार पोलिसांनी मारुती तुकाराम कदम व तानाजी तुकाराम कदम या दोघांची मुले लक्ष्मण मारुती कदम, मुकेश मारुती कदम, भरत मारुती कदम, मनोज तानाजी कदम, विनोद तानाजी कदम (रा. जावली) यांच्याविरुद्ध संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झांझुर्णे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The only land; Sell ​​only twice