वणवा प्रतिबंध सप्ताहाची केवळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:50+5:302021-02-08T04:33:50+5:30

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे वन परिमंडलात वन वणवा प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, या ...

The only formality of Vanua Prevention Week | वणवा प्रतिबंध सप्ताहाची केवळ औपचारिकता

वणवा प्रतिबंध सप्ताहाची केवळ औपचारिकता

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे वन परिमंडलात वन वणवा प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, या उपक्रमाचे योग्य नियोजन होत नसल्याने वन विभागाच्या या अर्थशून्य जागृतीला काहीही अर्थ उरत नसल्याचे दिसते.

वनक्षेत्रात जाणीवपूर्वक व अपघाताने लागणाऱ्या वणव्यामुळे मौल्यवान वनस्पती, झाडोरा, तसेच विविध प्रकारचे पशु-पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. त्याद्वारे प्रतिवर्षी मोठे नुकसान होते. कऱ्हाड तालुक्यातील कोळे वन परिमंडलाच्या वनाधिकाऱ्यांनी वनक्षेत्रालगत शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून वणवे लागू नयेत, यासाठी घ्यावयाची काळजी आणि होणारे परिणाम याबाबत प्रामुख्याने जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. एखाद्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमोर औपचारिकता पार पाडली जात आहे. विद्यार्थ्यांसोबतच प्रामुख्याने वनक्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्येही प्रबोधन करणे गरजेचे असताना तसे होत नाही.

कऱ्हाड तालुक्यातील कोळे बीट हे नऊशे हेक्टर वनक्षेत्र असलेले सर्वांत मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते, तर सामाजिक वनीकरणाचे सुमारे तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात घनदाट झाडी व डोंगर क्षेत्र मोठे असल्याने वन्य प्राण्यांची संख्याही जास्त आहे. ससा, बिबट्या, रानडुक्कर, काळवीट, आदी प्राण्यांसह सरपटणाऱ्या विविध जातीच्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. डोंगर पायथ्याला बारमाही पाणीसाठा असलेला वानरवाडी पाझर तलाव आहे. त्यामुळे पशु-पक्षांचा अधिवास वाढला आहे.

सध्या सर्वत्र गवत कापणी सुरू झाली आहे. वनक्षेत्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या गायरान, चालू जमिनी आहेत. शेताकडील बांधावरचे तर गायरानातील गवत कापणी केल्यानंतर साचलेला पालापाचोळा शेतकऱ्यांकडून पेटविला जातो. त्यावेळी अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्याने वनक्षेत्राला वणवा लागून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होते. वणवा लागू नये म्हणून वन विभागाकडून वन क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांना एकत्र करून जागृती करणे अपेक्षित आहे.

- चौकट

गावात चिटकविल्या नोटीस

गत महिन्यात कोळे वन परिमंडलात वनाधिकाऱ्यांकडून वन क्षेत्रालगतच्या गावातील सार्वजनिक, रहदारीच्या ठिकाणी वन वणवा जागृती नोटीस लावण्यात आल्या होत्या. मात्र, याच नोटीस शेतकऱ्यांना देऊन जागृती मेळावा घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही.

- चौकट

आवाज कमी, कशी होणार जागृती?

सध्या वन विभागाची एक जनजागृती गाडी हाकेच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीलाही आवाज जाणार नाही एवढ्या कमी आवाजात ध्वनिक्षेपक लाऊन रस्त्यावर जागृती करताना दिसत आहे. त्यामुळे या हेतू शून्य मोहिमेला कसलाच अर्थ उरत नाही.

Web Title: The only formality of Vanua Prevention Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.