नुसत्या घोषणांनी कामे होत नाहीत!
By Admin | Updated: March 10, 2016 23:40 IST2016-03-10T21:36:02+5:302016-03-10T23:40:46+5:30
प्रतापराव भोसले : यशवंत वारसा आळविताना भाजपवर टीका; राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

नुसत्या घोषणांनी कामे होत नाहीत!
कऱ्हाड : ‘देशाच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम चव्हाण यांनी केले. त्यांच्या विचारांची आज मोठ्याप्रमाणात गरज आहे. या सातारा जिल्ह्याने पाच मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. त्यांचे वारस आपण आहोत. ही परंपरा पुढे अशी टिकावी आमची भावना आहे. असे सांगत आजच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. घोषणा केल्या म्हणजे कामे केली असे होत नाही,’ अशी अप्रत्येक्षपणे टीका भाजपचे नाव न घेता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी केली.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय व शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गाडगे महाराज महाविद्यलायात आयोजित ‘यशवंतराव चव्हाण-विचार आणि वारसा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास गुरुवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. अशोक करांडे, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, डॉ. कन्हैय्या कुंदप, सुधीर एकांडे, प्राचार्य पी. टी. थोरात आदी उपस्थित होते.
प्रतापराव भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही होते. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी स्वत: कधीही विरोधकांना दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या काळ फार वेगळा होता. आत्ताचा काळ आणि राजकारणही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आज राजकारणात प्रामाणिक नेतृत्व उरले नाही. आत्ताचे सरकार हे नासमज आहे. त्यांच्याकडून शिक्षण व कारखाने, संस्थांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे.’
अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार-उत्तरप्रदेश झाला नाही. त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवले. साहित्यिक, समाजसुधारकांनंतर समाजात बदल घडवू पाहणारे दुसरे कोणी असेल तर ते यशवंतराव चव्हाण होय.’
प्रा. डॉ. अशोक करांडे यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आत्ताच्या राजकारण्यांना विमानाचा मोह..
‘पूर्वीच्या काळी केंद्रात व राज्यातील राज्यकर्त्यांना विमानात बसण्यासाठी फार कमी संधी मिळत होती. त्याकाळी विमानात बसणाऱ्यांचेही प्रमाण फार कमी होते. मात्र, आत्ताच्या राज्यकर्त्यांना जराही संधी मिळाली की, त्यांचे पाय जमिनीला टेकतच नाहीत. तसेच बाहेरची हवाही त्यांना सहन होत नसल्याने ते विमानातून उतरतच नसल्याचे दिसून येते,’ असे काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी सांगितले.