कानकात्रे तलावात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:26+5:302021-08-27T04:42:26+5:30
मायणी : मान्सून पूर्व व मान्सून हंगामामध्ये दमदार पाऊस न झाल्याने कानकात्रे येथील तलावात रोजी फक्त मृत पाणीसाठा शिल्लक ...

कानकात्रे तलावात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक
मायणी : मान्सून पूर्व व मान्सून हंगामामध्ये दमदार पाऊस न झाल्याने कानकात्रे येथील तलावात रोजी फक्त मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तलावामध्ये उरमोडी व तारळी योजनांचे पाणी सोडण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. दमदार पाऊस झाला नाही तर पुढील हंगाम धोक्यात येऊ शकतो.
खटाव तालुक्याच्या पूर्व भागाला शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी १९७२ मध्ये कानकात्रे येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकसहभागातून या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर रब्बी हंगामात या भागातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. शेतीला पाणी सोडण्यात आले. रब्बी हंगामातील पिके चांगली निघाली. अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागला त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. या कानकात्रे तलावामध्ये फक्त पावसाचे पाणी जमा होते. या तलाव भरण्यासाठी कोणतीही सिंचन योजना नाही. त्यामुळे या परिसरातून जाणारी उरमोडी व तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
प्रत्येक तीन वर्षांनंतर या भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शासनाने या तलावांमध्ये योजनांचे पाणी सोडण्याचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे.
चौकट
परिसरातून जाणाऱ्या तारळी व उरमोडी योजनांचे पाणी या तलावात सोडण्याची व्यवस्था करावी या तलावात या योजनांचे पाणी आले तर या भागातील शेतजमीन बाराही महिने ओलिताखाली येईल. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल.
- अनिल सावंत
सामाजिक कार्यकर्ते कानकात्रे
चौकट
परिसरामध्ये कोणतीही उपसा सिंचन योजना परिसरातील सोळा गावांचा आजही पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने या भागात नव्याने सर्वेक्षण करून तारळी व उरमोडीचे पाणी कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चौकट
जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर त्या भागातील सर्व लहान-मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आजही सुरू आहे. त्यामुळे हे नदीपात्रातून कर्नाटकात वाया जाणारे पाणी दुष्काळी खटाव तालुक्याच्या पूर्व भागाला सोडावे व या भागातील लहान-मोठे तलाव या पाण्याने भरून घ्यावे.
२६मायणी-कानकात्रे तलाव
कानकात्रे येथील तलाव पूर्ण कोरडा पडत असून यामध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. (छाया : संदीप कुंभार)