मोकाशी महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST2021-08-28T04:42:56+5:302021-08-28T04:42:56+5:30
कऱ्हाड : राजमाची, ता. कऱ्हाड येथील दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म जलसिंचन प्रणालीशी निगडित अद्ययावत तंत्रज्ञानाची ...

मोकाशी महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळा
कऱ्हाड : राजमाची, ता. कऱ्हाड येथील दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म जलसिंचन प्रणालीशी निगडित अद्ययावत तंत्रज्ञानाची ऑनलाइन कार्यशाळा पार पडली. अग्रोनोमी विभागप्रमुख आणि कृषी शाखेतील वैज्ञानिक अरुण देशमुख यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रेझेंटेशन देऊन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अजय मोरे, सोनल शिराळकर व प्रांजल जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शेटे व लाड यांनी केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऑनलाइन शाळेच्या नियोजनासाठी संस्थेचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी, संचालक विलास चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंतेत
कऱ्हाड : गत आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून, तालुकाभर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या भुईमूग, सोयाबीन यासारख्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गत आठवड्यापासून तर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
रेठऱ्याच्या ग्रामस्थांचे खासदारांना निवेदन
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील विकास कामांसाठी निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन सरपंच सुवर्णा कापूरकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले आहे. यावेळी कृष्णाचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते उपस्थित होते. प्रस्तावित कामे निवेदनाद्वारे सुचविण्यात आली आहेत. मदनराव मोहिते व अतुल भोसले यांच्या माध्यमातून गावामध्ये विकासकामे झाली आहेत. चोवीस तास पाणी योजना, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, संरक्षक भिंत या प्रमुख कामांसह नागरी सुविधा उभारण्यात यश मिळवले आहे. मात्र, आणखी काही कामे रखडली असून, त्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कसणी, धनगरवाडा ग्रामस्थांना साहित्य वाटप
कऱ्हाड : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या वतीने कसणी व धनगरवाडा, ता. पाटण येथील आपद्ग्रस्त कुटुंबीयांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, माजी विद्यार्थी किरण पाटील, यशवंत पुजारी, मारुती सूर्यवंशी, सुभाष कांबळे, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा. पी.डी. पाटील उपस्थित होते. आपद्ग्रस्त कुटुंबांना महाविद्यालयाने मदतीचा हात देऊन पुन्हा उभारी घेण्याचे बळ दिले आहे. ही मदत नसून कर्तव्य आहे, असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांनी केले.