ऑनलाइन ग्रामसभा कोरमअभावी तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:42+5:302021-06-06T04:28:42+5:30
गत दीड वर्षापासून कोरोनाने वेठीस धरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बैठक, कार्यशाळा, अभ्यास वर्ग ...

ऑनलाइन ग्रामसभा कोरमअभावी तहकूब
गत दीड वर्षापासून कोरोनाने वेठीस धरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बैठक, कार्यशाळा, अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. अशाच पद्धतीने ग्रामपंचायतींची ग्रामसभा घेण्याचे आयोजन बहुतेक ग्रामपंचायतींनी केले होते. त्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता. या कालावधीत संपूर्ण सोपस्कार पार पाडून सर्व विषयांची माहिती तसेच मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. यासाठी लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, ऑनलाइन बैठक किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागात नवीन असल्यामुळे तसेच कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या ग्रामस्थांना यामध्ये फारसा रस नसल्याने अनेकांनी या सभेकडे पाठ फिरवली. या ऑनलाइन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे अॅपही अनेकांकडे नाहीत. त्यामुळेही अनेक जण ग्रामसभेत सहभागी झाले नाहीत. परिणामी, कोरम पूर्ण न होऊ शकल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या.
- चौकट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून ग्रामसभा घेण्यातच आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रथमच हा ऑनलाइन ग्रामसभेचा प्रयोग करण्यात आला; पण सहभागाच्या उपस्थितीच्या अटी आणि नियमांमुळे अनेक गावांच्या ग्रामसभा कोरमअभावी होऊ शकल्या नाहीत. पार्ले, कोपर्डे हवेली, शामगाव आदी गावांसह इतर गावांचा त्यामध्ये समावेश आहे.