हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST2021-01-13T05:42:07+5:302021-01-13T05:42:07+5:30

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके तर कधी ...

Onion growers worried over climate change | हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

कुकुडवाड : आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे माण तालुक्यातील कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून कधी धुके तर कधी थंडीचा तडाखा, यामुळे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे कांद्याच्या लहान रोपावर करपा तसेच मर रोगांमुळे कांदा पातळ झाला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडत आहेत. महागडी औषधे वापरूनही काही फरक पडत नाही.

मागील काही महिन्यांपासून कांद्याचा बाजार वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कांद्याला चांगला दर मिळाला तर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेने शेतकरी कांद्याकडे लक्ष देत आहेत. पण वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

गेल्या महिन्यात वातावरण निवळत असल्याचे जाणवत होते. पण सध्या अचानक धुक्यासह ढगाळ वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरे पाहता गतवर्षीप्रमाणे थंडी अपेक्षित आहे, पण काहीच थंडी नाही. यामुळे हरभरा, ज्वारी, कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहे. मात्र, त्याचा परिणाम होताना दिसत नाही.

गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केला तर यंदा अवकाळी पावसाचा सामना केला. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले, तोपर्यंत पाऊस म्हणतो ‘मी पुन्हा येईन’ त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे कांदा साठवायला सोय आहे, त्यांना दोन पैसे मिळाले. यंदा कांदा लागवडीस सुरुवात केली; पण ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने तो पूर्णपणे सडून गेला. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला; पण होत्याचं नव्हतं झालं. केलेला खर्च पूर्णपणे वाया जाऊन लाखो रुपयांचा फटका बसला.

चौकट...

कांद्याची पात पडतेय पिवळी

शेतकरी रोपे आणून कांद्याची लागवड करीत आहे; पण रोगाने रोपे सुद्धा पिवळी पडत आहेत. कांद्याची पात ही पिवळी पडत असल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे. या दिवसांत पिकांना थंडी पोषक आले; मात्र, दोन दिवसांपासून गारवा नंतर ढगाळ वातावरण म्हणजे एका दिवसात पावसाळा आणि हिवाळा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती कोरडी होत नसल्याने तणाचा प्रादुर्भाव तर ऊन नसल्याने पिकाला पोषक वातावरण नाही. सगळीकडे शेतात तणाचा भरणा दिसत आहे. म्हणून शेतकरी वैतागला आहे. आज तरी शेतकरी हवामान बदलाची वाट पाहत आहे.

१०कुकुडवाड

माण तालुक्यात आठवडाभरापासून धुके, ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

Web Title: Onion growers worried over climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.