साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:08+5:302021-02-08T04:34:08+5:30

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक ...

Onion arrivals increased in Satara; Rate the same ... | साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

साताऱ्यात कांद्याची आवक वाढली; दर टिकूनच...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी भाव मात्र टिकून आहे. रविवारी ४०६ क्विंटल कांद्याची आवक होऊन दर ३३०० रुपयांपर्यंत मिळाला. तर बाजार समितीत भेंडी, गवार अन् शेवग्याचा दर तेजीत निघाला. तसेच मिरचीलाही चांगला भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण १०९१ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची ४०६ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला १ हजारपासून ३३०० रुपयांपर्यंत भाव आला. तर या वेळीही वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १० किलोला ८० ते १००, कोबीला २० ते ३० रुपये दर आला. फ्लाॅवरला १० किलोला ८० ते १२० रुपये भाव मिळाला. मागील एक महिन्यापासून कोबी, टोमॅटोला दर खूपच कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तेलाचा दर टिकून...

मागील काही आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर तेजीत आहे. या आठवड्यात दरात फारसा फरक पडलेला नाही. शेंगदाणा तेल डबा २३०० ते २५०० रुपयांपर्यंत असून सोयबीन तेल डबा १९५० ते २००० रुपयांदरम्यान आहे. तसेच सूर्यफूल तेल डब्याची किंमत १९५० ते २०५० रुपयांपर्यत आहे. एक किलो पाऊचमागे दोन ते तीन रुपये वाढ आहे.

कलिंगडाची आवक

बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगडाची आवक झाली. बाजारात एका कलिंगडाचा दर १० रुपयांपासून होता.

वाटाणा स्वस्त...

बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, शेवग्याचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४०० रुपये, भेंडी ३५० ते ३८०, शेवग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.

साताऱ्यातील मंडईत भाज्यांचे दर अजूनही ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. साधारणपणे ४० ते ६० रुपये किलोपर्यंत सर्व भाज्या मिळत आहेत. गवार, शेवग्याचा दर तेजीतच आहे.

- स्मिता पवार, ग्राहक

सातारा बाजार समितीत कांद्याचा दर टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. असे असले तरी वाटाणा, आले आणि इतर काही भाज्यांना म्हणावे असा दर मिळत नाही.

- रामचंद्र इंगवले, शेतकरी

सध्या खाद्यतेलाचा दर वाढलेलाच आहे. कारण, भारतातील तेल मार्केट हे आयातीवर अवलंबून आहे. त्यातच देशातील तेल पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात.

- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी

Web Title: Onion arrivals increased in Satara; Rate the same ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.