जलस्त्रोत बळकटीकरणाचे एक काम दहा दिवसांत...
By Admin | Updated: February 18, 2015 23:46 IST2015-02-18T22:36:49+5:302015-02-18T23:46:44+5:30
जिल्हाधिकारी यांच्या सूचना : २१५ गावांत ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा धडाका

जलस्त्रोत बळकटीकरणाचे एक काम दहा दिवसांत...
सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये आराखडा तयार करण्यात आलेल्या २१५ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरणाचे किमान एक काम येत्या दहा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.‘जलयुक्त शिवार’ अभियानाची पूर्वतयारी आढवा बैठक मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, राजेंद्र जाधव, जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. अविनाश पोळ, संजीव जाधव, मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा समिती अधिकारी प्रशांत सातपुते आदींसह विविध विभागांचे प्रमुख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.‘जलयुक्त शिवार’ अभियान हे राज्य शासनाचे सर्वाधिक प्राधान्याचे अभियान असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ‘विविध विभागांच्या जलसंधारणाच्या, जलस्त्रोत बळकटीकरणाच्या योजना एकत्रित करून हे अभियान राबविण्यात येत आहे. २०१६ मध्ये जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने प्राधान्यक्रमाने २१५ गावे निवडली असून, त्यांचा एकूण ५३४ कोटी ६५ लाख ८१ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या या २१५ गावांमध्ये २७६ ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यात २० गावांत ३० कामे, वाई तालुक्यात २३ गावांत २८, माण २४ गावांत १८, कऱ्हाड १० गावांत २५, जावळी २० गावांत १९, पाटण २० गावांत १४, खंडाळा ८ गावांत २४, महाबळेश्वर १७ गावांत १४, फलटण २३ गावांत १३, खटाव २३ गावांत ६७ व कोरगाव तालुक्यात २५ गावांत २४ कामांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थतीत ही कामे पूर्ण करावीत.या आर्थिक वर्षात आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध आहे. फक्त मोहीम स्वरूपात काम गतीने चालू करावे. अनेक अशासकीय संस्था सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था आदींना या कामात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकारात्मक जनभावना निर्मिती होण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)