दहापैकी एका व्यक्तीला कर्करोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:00+5:302021-02-05T09:09:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तंबाखूमुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा संबंध सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी आहे. ...

One in ten people have a risk of cancer | दहापैकी एका व्यक्तीला कर्करोगाचा धोका

दहापैकी एका व्यक्तीला कर्करोगाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तंबाखूमुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा संबंध सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी आहे. दहापैकी एका व्यक्तीला कर्करोगाचा धोका तर पंधरापैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. पुरुषांत प्रामुख्याने मुख कर्करोग आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे अधिक प्रमाण आहे.

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.

अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण सेवा क्षेत्रातील कमी गुंतवणुकीमुळे २०४० पर्यंत कर्करुग्णांची संख्या ८१ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याचा धोका आहे. पंधरापैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो. जागतिक कर्करोग अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात कर्करोगाचे नवीन ११.६ लाख रुग्ण आढळले. या अवधीत ७ लाख ८४ हजार ८०० जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर गेल्या पाच वर्षांपासून २२ लाखांहून अधिक लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. एकूण भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येभोवती कर्करोगाचा जीवघेणा विळखा घट्ट होत असल्याचे दिसते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात धूम्रपान करणाऱ्यांपैकी ८० टक्के धूम्रपान करणारे अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांतील आहेत. पुरुषांत एकूण ५ लाख ७० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आहेत. यात ९२ हजार मुखकर्करोग, ४९ हजार (फुफ्फुसाचा कॅन्सर), ३९ हजार (पोटाचा कॅन्सर) आणि आतडे-मलमार्ग कॅन्सरच्या नवीन कर्करुग्णांची संख्या ३७ हजार आहे. भारतातील विकसित राज्यात आणि शहरी भागात आतडे-मलमार्ग कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तसेच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते. महिलांमध्ये ५ लाख ८७ हजार नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळले आहेत. जगभरात धूम्रपान करणाऱ्या पुरुषांपैकी ५० टक्के लोक चीन, भारत, इंडोनेशियात आहेत.

चौकट :

भारतात मुख्यत्वे सहा प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. १ लाख ६२ हजार ५०० जणांना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळले. मुख कर्करोगाचे रुग्ण १ लाख २० हजार रुग्ण आढळले. पोटाच्या कर्करोगाचे ५७ हजार रुग्ण आढळले असून, आतडे-मलमार्ग कर्करोगग्रस्तांची संख्या ५७ हजार आहे. फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या ६८ हजार आहे. एकूण कर्करोगाच्या नवीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ४९ टक्के आहे.

कोट

कर्करोगाचे पहिल्या टप्प्यात निदान झाले तर त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य असते. दुर्दैवाने कर्करोगाचे निदान तिसऱ्या टप्प्यात होते. परिणामी कर्करोगामुळे मृत्यू होतो असा सार्वत्रिक समज आहे. कर्करोग टाळण्यासाठी विशिष्ट कालाने तपासणी करणं आवश्यक आहे.

- डॉ. धीरज खडकबाण, सर्जिकलॉजिस्ट

Web Title: One in ten people have a risk of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.