साताऱ्यात शंभर पोती गुटखा जप्त
By Admin | Updated: December 31, 2014 00:21 IST2014-12-31T00:14:34+5:302014-12-31T00:21:48+5:30
ट्रकचालक ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

साताऱ्यात शंभर पोती गुटखा जप्त
सातारा : स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा संयुक्तपणे कारवाई करत शंभर पोती गुटखा जप्त केला. याप्रकरणी चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले असून त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जप्त करण्यात आलेल्या गुटखा पुड्यांची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची सांगण्यात येते. ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव संतोष शिवमूर्ती पिसुरे (रा. मूळ गाव, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) असे आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी पहाटेपर्यंत गुटखा पुड्या मोजण्याचे काम करत होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शाहूपुरी येथे एका ठिकाणी शंभर पोती गुटखा असून, तो येथून आज रात्री हलविण्यात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. यानंतर सापळा रचण्यात आला.
शाहूपुरी परिसरात ज्यावेळी ट्रकचालक संतोष पिसुरे यास ताब्यात घेण्यात आले त्यावेळी तो काही बोलायला तयार नव्हता. मात्र, नंतर त्याने आवश्यक ती सर्व माहिती दिली. नंतर पोलिसांनी ट्रक (एमएच 0५ एएम ३0३३) स्थानिक गुन्हे शाखेत आणला. येथे ट्रकचालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ट्रकमध्ये शंभर पोती गुटखा असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचारी ट्रकमधून गुटखा बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करत होते. याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)