एकीकडे म्हणे जलजागृती; दुसरीकडे मात्र डुलकी!
By Admin | Updated: April 5, 2016 00:56 IST2016-04-05T00:56:47+5:302016-04-05T00:56:47+5:30
सामाजिक कार्यकर्त्याकडून भांडाफोड : धोम पाटबंधारे विभागातील लिपिकाच्या ‘वामकुक्षी’चे बिनधास्त चित्रीकरण

एकीकडे म्हणे जलजागृती; दुसरीकडे मात्र डुलकी!
सातारा : धोम धरणात केवळ १६.३४ टक्के पाणीसाठा उरला आहे. या धरणावर लाभार्थी असणारे शेतकरी पाणी-पाणी करून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एका बाजूला शासन ‘जलजागृती’ सप्ताह राबवून पाणी बचतीचे संदेश देत आहे, याचवेळी धोम पाटबंधारे कार्यालयातील लिपिक मात्र कामावर येताच दिवसा-ढवळ्या डुलक्या घेत असल्याचे उघडकीस आले आहे. या कर्मचाऱ्याच्या डुलक्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘आॅन द स्पॉट’ कॅमेराबद्ध केल्या.
सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके व त्यांचे सहकारी मित्र संजय कांबळे हे सोमवारी पाणी परवान्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत धोम पाटबंधारे विभागात गेले होते. दुपारी साडेबाराची वेळ... त्याचवेळी हे दोघे कार्यालयात गेले. तेव्हा धोम पाटबंधारे विभागाचे प्रथम लिपिक पी. डी. सावंत हे आपल्या खुर्चीत बसून डुलक्या घेत होते. शेळके यांनी ा खुर्चीवर डुलक्या खातानाचे चित्रीकरणही तब्बल काही मिनिटे केले.
काही वेळाने कार्यालयातील एका शिपायाने सावंतांची वामकुक्षी मोडली. डोळे उघडल्यानंतर आपण कॅमेराबद्ध झाल्याचे पाहून सावंत यांनी तिथून पळ काढला. अर्धी रजा टाकून ते कार्यालयातून गायब झाल्याचीही चर्चा कार्यालयात नंतर सुरू झाली. शासनाचा पगार... शासनाचे कार्यालय... शासनाचा टेबल... शासनाची खुर्ची; पण शासनाचं म्हणजे पर्यायानं लोकांचं काम करायचं नाही, त्यांना तंगवत ठेवायचं, लोकांना हेलपाटे मारायला लावायचं, या कलेत तरबेज असणारी ही शासकीय प्रवृत्ती कार्यालयात आल्यानंतर किती मुजोरपणे वागत असते, याचे हे जाहीर उदाहरण ठरले आहे.
पावसाने तोंड फिरवले, धरणांत पाणी नाही, भेगाळलेल्या जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे, अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेले शेतकरी सावंतांसारख्या प्रवृत्तीमुळे आणखी पिचले जात आहेत, अशी नाराजी शेळके यांनी व्यक्त केली. शेळके म्हणाले, ‘धोम कार्यालयातील शेती पाणीउपसा परवाना देण्याचे काम जिल्हास्तरावरून दिले असताना शेतकऱ्यांना केवळ नाहक त्रास देण्याचे व यातून गैरलाभ उठविण्याच्या हेतूने पुणे कार्यालयातून परवाना मिळेल, असा फतवा काढण्यात आला होता. पुणे कार्यालयाकडून याबाबत स्पष्ट आदेश दिले गेले, त्याची प्रत आणण्यासाठी कार्यालयात गेलो असता शासकीय इतमामात संबंधित लिपिकाच्या डुलक्या सुरू होत्या.’