शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची भीती!
By Admin | Updated: July 9, 2014 00:03 IST2014-07-08T23:45:30+5:302014-07-09T00:03:25+5:30
पावसाची पाठ : कास तलावातील पाणी अवघ्या साडेचार मीटरवर

शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची भीती!
सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने कास तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सातारा शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात कदाचित एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची भीती पालिका प्रशासनाने वर्तविली असली तरी पाणी वाया घालविणाऱ्यांना या परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे चित्र अजूनही पाहायला मिळत आहे.
कास तलावात सध्या केवळ साडेचार फूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. पावसाने आणखी ओढ दिल्यास हा साठाही आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. कासजवळून ओढ्यात वाया जाणारे पाणीही तलावात पुन्हा टाकले जात आहे. दरम्यान, सध्या पाणी झपाट्याने कमी झाले असल्याने कास योजनेवरील साठवण टाक्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांत एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आगामी संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती लीना गोरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कास धरण, उरमोडी व कृष्णा नदी या तीनही उद्भवांतील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. जुलै महिना सुरु होऊन नऊ दिवस ओलांडले असले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी आणखी दहा ते पंधरा दिवस पुरेल. पाऊस पडला नाही, तर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढविण्याची भीती आहे.काही नागरिक आजही दारात पाईपा लावून वाहने धूवत आहेत. ५0 ते ६0 नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. (प्रतिनिधी)