वाल्मीकवर निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:37+5:302021-03-25T04:37:37+5:30

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या वाल्मीक मंदिर परिसरात विपुल जंगल क्षेत्र आहे. तसेच हे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी ...

One crore sanctioned for nature center at Valmik | वाल्मीकवर निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर

वाल्मीकवर निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या वाल्मीक मंदिर परिसरात विपुल जंगल क्षेत्र आहे. तसेच हे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी भाविकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. वाल्मीकी ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला वाल्मीक मंदिर परिसर हा जंगलाने समृद्ध असून, येथे विविध जातींचे प्राणी, पक्षी व झाडे आहेत. हा जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. याशिवाय वाल्मीकी मंदिर डांबरी रस्त्याने जोडले गेले असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी अपेक्षित पर्यटन विकास झाला नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. आलेल्या पर्यटकांना निसर्गाची माहिती मिळावी याकरिता निसर्ग उद्यान केंद्राची नितांत गरज होती.

निसर्गाच्या सान्निध्यात राहून पशुपक्षी, झाडे यांची माहिती पर्यटकांना व्हावी याकरिता पाणेरी येथे वाल्मीकी मंदिराजवळ निसर्ग केंद्र स्थापन करावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी वनविभागाकडे केली होती. त्यांनी केलेली ही मागणी मंजूर झाली असून, येथील निसर्ग अध्ययन केंद्रासाठी वनविभागाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या केंद्राचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी वन्यजीव प्रमुख दिलीप काकोडकर यांना केली आहे.

- चौकट

..असे असणार अध्ययन केंद्र

निसर्ग उद्यान केंद्राच्या इमारतीमध्ये विविध पशू, पक्षी, झाडे यांचे चित्रे, फोटो, त्यांची शास्त्रीय माहिती लावण्यात येणार आहे. पशु, पक्ष्यांच्या आवाजाची यंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यातून लहान मुलांना निसर्गाची ओळख व्हावी, असा उद्देश आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचीदेखील संपूर्ण माहिती या केंद्रात दिली जाणार आहे. यासंदर्भातील चित्रफिती दाखवण्याचीसुद्धा त्याठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: One crore sanctioned for nature center at Valmik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.