पोलीस ठाण्याच्या मागेच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:37+5:302021-02-05T09:11:37+5:30
वडूज : जमिनीच्या वादातून लोक त्रास देत असून, जमिनीवर अतिक्रमण केल्याने, वडूज पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वायरलेस ...

पोलीस ठाण्याच्या मागेच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
वडूज : जमिनीच्या वादातून लोक त्रास देत असून, जमिनीवर अतिक्रमण केल्याने, वडूज पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वायरलेस टॉवरवर चढून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारी ( दि.२ ) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिध्देश्वर कुरोली येथील सागरेश्वर अनंता बनसोडे ( वय ३४ ) हा वडूज पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सुमारे पन्नास ते सत्तर फूट उंचीच्या वायरलेस टॉवरवर जाऊन बसला होता. तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सागरेश्वर बनसोडे हा मोठमोठ्याने ओरडत माझ्या जमिनीवर अतिक्रमण केले असून, मला तेथील लोक त्रास देत आहेत असे म्हणत होता. आवाज कसला येतोय म्हणून वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहिले तर बनसोडे हा उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. घटनास्थळावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला खाली येण्यास विनंती केली. तरी तो जुमानत नव्हता. रात्री साडेआठपासून साडेअकरा वाजेपर्यंत हा वायरलेस टॉवरवरील थरार वडूजकर अनुभवत होते.
दरम्यान, सातारा येथून अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आले. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व वडूज पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी बनसोडे यांची समजूत काढून त्यास खाली येण्यास भाग पाडले. त्यावेळी कुठे पोलीस अधिकारी, कर्मचारी व घटनास्थळावरील उपस्थितांच्या जिवात जीव आला. सुमारे चार तास सुरू असलेल्या या थराराचे वर्णन दिवसभर वडूज परिसरात ऐकायला मिळत होते.