कोट्यवधींची फसवणूकप्रकरणी सुखेडमध्ये एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:38+5:302021-02-14T04:37:38+5:30
लोणंद : पाच महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो म्हणून सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, अहमदनगर, बागलकोट (कर्नाटक) जिल्ह्यांमधील सर्वसामान्य नागरिकांची ...

कोट्यवधींची फसवणूकप्रकरणी सुखेडमध्ये एकाला अटक
लोणंद : पाच महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो म्हणून सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, अहमदनगर, बागलकोट (कर्नाटक) जिल्ह्यांमधील सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॉयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे यास लोणंद पोलिसांनी सुखेड येथे सापळा रचून अटक केली.
याबाबत माहिती अशी की, रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे रा. कुसुर ता. फलटण व त्याचे अन्य साथीदार या कंपनीच्या माध्यमातून पाच महिन्यांत दामदुप्पट करून देतो म्हणून २८ ते ३० एजंटांमार्फत सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, नगर, बागलकोट (कर्नाटक ) या जिल्ह्यांतील महिलांचे बचत गट व प्रत्यक्ष खातेदारांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करून पन्नास हजार रुपयांपासून बारा लाख रुपयांपर्यंत रक्कम दामदुप्पट करून देतो. अशा बोलीवर रक्कम जमा करून घेत होते. या माध्यमातून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. याबाबत विठ्ठल कोळपे, अनिल कोळपे, संदीप येळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विठ्ठल कोळपे फरार झाला होता.
दरम्यान, विठ्ठल कोळपे हा सुखेड येथील त्याच्या बहिणीकडे येणार असल्याची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे संतोष चौधरी, पोलीस हवालदार श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे व दत्ता दिघे यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने विठ्ठल यास अटक केली. कंपनीचा मुख्य सूत्रधार अटक झाल्याने कंपनीचे इतर संचालक, एजंट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी तपास करीत आहेत.