दीड वर्षाच्या चिमुकल्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू
By Admin | Updated: April 10, 2016 00:10 IST2016-04-09T23:59:03+5:302016-04-10T00:10:15+5:30
उत्तर कोपर्डेतील घटना : अनावधानाने क्लचवर पडला पाय

दीड वर्षाच्या चिमुकल्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू
कोपर्डे हवेली : अनावधानाने क्लचवर पाय पडल्यामुळे टायरनजीक खेळणारा दीड वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरखाली सापडून ठार झाला. उत्तर कोपर्डे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीलगत शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोहम सुनील देवकर असे त्या चिमुरड्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोपर्डे येथे सुनील देवकर हे वडील माणिक, पत्नी राणी, दोन मुली व सोहम यांच्यासमवेत राहतात. ग्रामपंचायतीलगतच देवकर कुटुंबीयांचे घर आहे. सुनील यांचा ट्रॅक्टर (एम. एच. २३ टी. ७२८) असून ते त्याद्वारे ऊस वाहतुकीचे काम करतात. ट्रॅक्टरसाठी ऊसतोडणी करणारी मजुरांची टोळीही ग्रामपंचायतीपासून काही अंतरावर वास्तव्यास आहे. शुक्रवारी पाडव्याचा सण असल्याने ऊसतोडणीला सुटी होती. सर्व मजूर त्यांच्या झोपड्यांमध्येच होते, तर सुनील यांनीही त्यांचा ट्रॅक्टर घरानजीक उतारावर उभा केला होता. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुनील हे ट्रक्टरमध्ये मित्रांसह गप्पा मारत बसले होते. ट्रॅक्टरच्या स्वीचला लावलेली चावी तशीच होती. ट्रॅक्टरशेजारी सुनील यांचे वडील माणिक, पत्नी राणी हे दोघेजण थांबले होते, तर दीड वर्षांचा सोहम ट्रॅक्टरच्या टायरनजीक खेळत होता. त्याचवेळी अचानक कोणाचा तरी पाय ट्रॅक्टरच्या क्लचवर पडला. उतार असल्याने ट्रॅक्टर लगेच पुढे सरकला. त्याचवेळी अचानक ट्रॅक्टरचा स्टार्टर सुरू झाल्याने ट्रॅक्टर काही अंतर तसाच पुढे गेला. हा प्रकार निदर्शनास येताच राणी यांनी सोहमला टायरजवळून लांब खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रॅक्टरचा टायर पायावरून गेल्याने तसेच इतर दुखापत झाल्याने सोहम जखमी झाला.
यावेळी मायलेकरांच्या किंकाळ्यांनी सर्व परिसर शहारला. ग्रामस्थ व नातेवाइकांनी सोहमला तातडीने कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल केले. अति रडण्याने व घाबरल्याने सोहमला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने शनिवारी सकाळी सोहमचा मृत्यू झाला. (वार्ताहर)