बेदरकार चालकाने हिरावले वृद्ध आईवडिलांचे ‘तारुण्य’
By Admin | Updated: December 2, 2014 23:27 IST2014-12-02T22:15:43+5:302014-12-02T23:27:36+5:30
मणके, गुडघे दुखावले : आधुनिक ‘श्रावणबाळा’ची भरपाईसाठी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव

बेदरकार चालकाने हिरावले वृद्ध आईवडिलांचे ‘तारुण्य’
पुसेगाव : फलटण आगाराच्या चालकाने बेजबाबदारपणे एसटी चालवल्याने प्रवासादरम्यान वयोवृध्द आई-वडिलांच्या झालेल्या गंभीर दुखापतीबाबत न्याय मिळावा; तसेच त्यांच्यावर झालेल्या औषधोपचाराचा खर्च मिळावा, अशी मागणी डिस्कळ येथील दीपक सूर्यभान कर्णे यांनी केली आहे. फलटण आगार व्यवस्थापक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.२२ नोव्हेंबर रोजी फलटण आगाराच्या फलटण-वडूज या एसटीमधून सकाळी आई सुलोचना कर्णे (वय६५, रा. डिस्कळ) या आजारी असल्याने वडील सूर्यभान कर्णे (वय ७५) त्यांना घेऊन पुसेगावला दवाखान्यात निघाले होते. गाडीत गर्दी होती म्हणून या वृध्द दाम्पत्याला पाठीमागील सीटवर बसावे लागले. डिस्कळ-पुसेगाव रस्ता जागोजागी खराब असल्याने एसटीचालकाने गाडी जबाबदारीने चालवणे गरजेचे होते. वाहक तिकीट काढण्यासाठी जवळ आल्याने सूर्यभान कर्णे खिशातून ज्येष्ठ नागरिक पास व पैसे काढू लागले. तेवढ्यात मोठ्या खड्ड्यात गाडी जोरात आपटल्याने वडील जोरात उडून त्यांचे डोके एसटीच्या वरील जाळीला धडकले आणि ते खाली पडले. त्यांच्या पाठीच्या मणक्यांना व मानेला जोरात झटका बसला व ते चक्कर येऊन कोसळले. आईच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. पती चक्कर येऊन पडल्याचे पाहून व गुडघ्याला लागलेला मार सहन न झाल्याने सुलोचना यांनी हंबरडा फोडला. प्रवाशानी आरडाओरडा केल्याने चालकाने बस थांबवली. गावातील लोकांनी ही माहिती या दाम्पत्याच्या मुलांना दिली. त्यांनी तातडीने त्यांना रूग्णालयात नेले. (वार्ताहर)
उतारवयातही कुटुंबप्रमुख म्हणून आमचे वडील सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलत होते. त्यांना कोणताही आजार नव्हता; मात्र एसटीचालकाच्या बेजबाबदारपणामुळे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राखीव जागा मिळवून देण्याबाबत वाहकाने केलेल्या दुर्लक्षामुळे आमच्या वयोवृध्द आई-वडिलांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
- संतोष सूर्यभान कर्णे, डिस्कळ
खड्ड्यानंतरचा मोठ्ठा ‘खड्डा’
दि. २२ ते २७ या काळात या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. सुमारे ४० हजार रूपये खर्च होऊनही आजारपणात वाढच झाली, असे संतोष यांचे म्हणणे आहे.
सूर्यभान यांची उजवी बाजू आज ५० टक्केच कार्यरत आहे. ते स्वत:च्या हाताने जेवू शकत नाहीत. पायावर भार पडल्यास चालताही येत नाही.
आई या प्रसंगाने कमालीची भेदरली आहे. फलटण आगाराचे चालक-वाहक व आगारप्रमुखांनी साधी विचारपूसही केली नाही.
रुग्णालयाच्या खर्चाची एसटीकडून भरपाई मिळावी व चालक-वाहकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी दीपक यांनी केली आहे.