वयस्कर मुलाची आत्महत्या; आईचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: August 5, 2014 23:27 IST2014-08-05T22:50:08+5:302014-08-05T23:27:37+5:30
वृद्धेचा खून ? : सदर बझारमधील घटना

वयस्कर मुलाची आत्महत्या; आईचा मृतदेह आढळला
सातारा : सदर बझारमधील जयनगर हौसिंग सोसायटीतील वयस्कर मुलगा आणि आईचा घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वयस्कर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र, आईची आत्महत्या की खून, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत. मंगेश विष्णू देशपांडे (वय ५२), लीला विष्णू देशपांडे (८६) अशी वयस्कर मायलेकरांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे दोघेच घरात राहत होते. काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. आज, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर मंगेश देशपांडे यांनी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तर त्याची आई घरात मृतावस्थेत आढळली.
मायलेकरांचा घरात मृत्यू झाल्याचे समजताच सदर बझारमधील नागरिकांनी जयनगर हौसिंग सोसायटीकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदन अहवालानंतरच लीला देशपांडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)