अधिकाऱ्यांची टक्केवारी, ठेकेदारांची दिवाळी!

By Admin | Updated: April 3, 2016 23:34 IST2016-04-03T22:10:58+5:302016-04-03T23:34:24+5:30

पाटण : बांधकाम विभाग; रस्त्यांची कामे अर्धवट, जनतेची गैरसोय अन् लाखो रुपये पाण्यात...

Officials, Diwali of contractor's Diwali! | अधिकाऱ्यांची टक्केवारी, ठेकेदारांची दिवाळी!

अधिकाऱ्यांची टक्केवारी, ठेकेदारांची दिवाळी!

पाटण : तालुक्यातील बांधकाम विभागात गेल्या वर्षापासून सर्व काही आलबेल सुरू असल्याने बांधकामच्या शाखा अभियंत्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या तक्रारी आहेत. राजकीय वरदहस्त लाभलेले काही अधिकारी तर कार्यालयात दिसेनासे झाले आहेत. दुसरीकडे रस्ते, नाले, पूल पिण्याच्या पाण्याची योजना यांची कामे करणारे ठेकेदार मनमानीपणे कामे करत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट तर कोठे निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची वेळ आली आहे.
पाटण तालुक्यात ठेकेदारी करण्याचा फंडा वाढत चालला आहे. कोणीही उठत आहे आणि रस्ते व इतर बांधकामाचा ठेका घेत आहे अशी स्थिती आहे. त्यातच अलीकडील काळात राजकीय लेबलचा वापर जास्त होत चालल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे काही अधिकारी तर चुकीच्या पध्दतीने वागू लागले आहेत. त्यामुळे ठेकेदारांकडून सक्तीने टक्केवारी घेतली जाऊन संबंधित कामाचा दर्जा व कालावधीकडे दुर्लक्ष होत चालले असल्याच्या तक्रारी जनतेकडूनच व्यक्त होऊ लागलेल्या आहेत.
दुसरीकडे ठेकेदारसुद्धा मी अमक्याचा, तमक्याचा माणूस आहे. त्यामुळे मी केलेल्या किंवा इतर बांधकामाची तपासणी करण्यास कोणाचेही धाडस होणार नाही, अशा वल्गना त्यांच्याकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही अधिकारी राजकारणी, नेत्यांचे नाव सांगून चक्क सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यावर कोणीतरी अंकूश लावणे आवश्यक झालेले आहे. (प्रतिनिधी)
बांधकामचे अधिकारी - ठेकेदार यांच्यात स्पर्धा
अलीकडील काळात बांधकामचे अधिकारी व ठेकेदार यांची तालुक्यातील सत्ताधारी मंडळी, नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी जास्त जवळीक वाढू लागली आहे. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकेना. याचा परिणाम तालुक्यातील रस्ते व इतर बांधकामावर होत आहे.
मोरणा विभागातील जनतेची गैरसोय
परिसरातील मोरणा नदीवरील पुलाचे काम अर्धवट आहे. इतर गावांतील रस्त्यांची व फरशी पुलाची कामे निकृष्ट आणि विलंबाने होत असल्याची ओरड जनतेतून होत आहे. यास जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होत आहे.
येत्या मे महिनाअखेर तालुक्यातील सर्व सार्वजनिक बांधकाम रस्ते, फरशी पूल, शासकीय व ग्रामस्तरावरील इमारती यांची कामे त्वरित पूर्ण व्हावीत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील निकृष्ट बांधकामाची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच पावसाळ्याच्या अगोदर कामे पूर्ण करण्याची गरज आहे.
- बाबासाहेब मोरे, पापर्डे
 

Web Title: Officials, Diwali of contractor's Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.