‘आतल्या अन् बाहेरच्या’ अपक्षांमुळे अधिकृत उमेदवार गोंधळात..
By Admin | Updated: April 8, 2016 23:57 IST2016-04-08T23:21:03+5:302016-04-08T23:57:15+5:30
अपक्षांची संख्या जास्त असल्याने मोठी मतविभागणी होणार आहे. याचा फायदा काँग्रेसला का राष्ट्रवादीला मिळणार याबाबत कयास

‘आतल्या अन् बाहेरच्या’ अपक्षांमुळे अधिकृत उमेदवार गोंधळात..
दशरथ ननावरे - लोणंद --लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ प्रभागांमध्ये २० अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटून रंगत आणली आहे. अपक्षांनी छुप्या प्रचाराचा गनिमी कावा आखत प्रमुख पक्षांना अडचणी निर्माण केल्या आहेत. काही अपक्ष उमेदवार आपल्याला पक्षातीलच काही लोकांचा अंतर्गत पाठिंबा असल्याचे छातीठोकपणे सांगू लागल्याने ‘आतले आणि बाहेरचे’ चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्र. १ मधून प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवाजीराव शेळके यांनी राष्ट्रवादीच्या हणमंत शेळके यांना आव्हान दिले आहे. मात्र शिवाजीराव शेळके यांना मतांची रसद मिळू नये, यासाठी शंकर क्षीरसागर यांचीही अपक्ष उमेदवारी ठेवण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याची चर्चा आहे. प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादीला उमेदवार नसल्याने येथे अपक्ष विठ्ठल साळुंखे यांना साथ देण्याचा निर्णय घेणार का? अशी चर्चा आहे.
प्रभाग ३ मध्ये अपक्षांची संख्या जास्त असल्याने मोठी मतविभागणी होणार आहे. याचा फायदा काँग्रेसला का राष्ट्रवादीला मिळणार याबाबत कयास लावले जात आहेत. कारण राष्ट्रवादीच्या सचिन शेळके यांनी ऐनवेळी रिंगणात लढण्याचा घेतलेला निर्णाय कशासाठी याचा तर्कवितर्क लावला जातोय. प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्याने येथील अपक्ष उमेदवार मंगल कांबळे यांनी हातात पतंग घेऊन मनगटावर घड्याळ बांधल्याने मोठी चुरस वाढली आहे. प्रभाग १२ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ आहे. मात्र काँग्रेसकडून बंडखोरी करत शाहीन बबलू इनामदार यांनी अपक्ष रणांगणात उतरल्याने मोठे आव्हान ठरले आहे. येथे अंतर्गत हालचालींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची बारकाईने नजर आहे.
प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादीचे नेते आंनदराव शेळके-पाटील व काँग्रेसचे पुरुषोत्तम हिंगमिरे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवारालाच साथ द्यावी लागते आहे. अपक्ष योगेश परदेशी यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने मदार सोपविली आहे. प्रभाग १५ मध्ये लोणंदच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे गणीभाई कच्छी यांनी आपल्या पत्नीचा अपक्ष अर्ज ठेवल्याने येथे रंगत वाढली आहे. तर प्रभाग १६ मध्ये काँग्रेसचे सर्वेसर्वा बाळासाहेब बागवान यांची राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांच्याशी लढत होणार असून, भाजप शिवसेनेनेही येथे शक्ती लावली आहे.
निवडणुकीत अपक्षांनी धुरळा उडविल्याने पक्षीय राजकारणाची गणिते बदलली गेली आहेत. अगोदर नगरसेवक नंतर पक्षाची निष्ठा असाच विचार करून अनेकांनी रणशिंग फुंकल्याने मोठी चुरस वाढली आहे. मात्र, यात नक्की बाजी कोण मारणार, हे मतदारराजाच ठरवणार आहे.
अपक्षांचे आव्हान मोडीत काढण्याचे प्रयत्न
वास्तविक अर्ज माघारीसाठी रात्रीच्या अंधारात प्रकट झालेले उमेदवार अर्ज माघार घेतो, असे सांगून दिवसा उजेडी गायब झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते; परंतु गेला तो आपला नव्हताच, अशी भूमिका घेत पक्षप्रमुखांनी पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकवटण्याचे आव्हान केले. प्रचार करण्याबरोबरच अपक्षांचे आव्हान मोडीत काढण्यासाठीच प्रमुख पक्षांची शक्ती खर्ची पडत आहे.