चाफळ येथील रामाच्या मूर्तीसाठी दहा लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:28+5:302021-09-14T04:45:28+5:30
चाफळ : चाफळ येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने ते नावारूपाला येत आहे. त्यातच ...

चाफळ येथील रामाच्या मूर्तीसाठी दहा लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण
चाफळ : चाफळ येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने ते नावारूपाला येत आहे. त्यातच कऱ्हाड येथील उद्योगपती श्रीकांत शंकरशेठ बुटाला या श्रीराम भक्ताने आई-वडिलांच्या स्मरणार्थ चाफळ येथील श्री रामास दहा लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अर्पण केला.
कऱ्हाड येथील उद्योगपती बुटाला हे सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांची आई दिवंगत इंदिरा व वडील दिवंगत शंकर शेठ बुटाला हे दाम्पत्य प्रभू श्रीरामाचे भक्त होते. ते नेहमी चाफळ येथील श्री रामाच्या दर्शनासाठी येत असत. प्रभू श्रीरामामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत आहे. या श्रद्धेने प्रेरित होऊन दिवंगत बुटाला दाम्पत्याने प्रभू श्रीरामास सोन्याचा मुकुट अर्पण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. तशी इच्छा त्यांनी सुपुत्र श्रीकांत यांच्यासमोर बोलून दाखविली होती. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे हे स्वप्न अर्धवटच राहून गेले होते.
उद्योगपती श्रीकांत बुटाला यांनी आई दिवंगत इंदिरा व वडील दिवंगत शंकर शेठ बुटाला यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्रीकांत बुटाला कुटुंबियाने चाफळ येथील श्री रामास दहा लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट नुकताच अर्पण केला आहे.
याप्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर विश्वस्त अनिल साळुंखे, विश्वस्त लक्ष्मण सीताराम बाबर, चाफळचे सरपंच आशिष पवार, सरव्यवस्थापक बा. मा. सुतार, व्यवस्थापक धनंजय सुतार, पुजारी महेश कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, दर्शन जंगम यांच्यासह बुटाला कुटुंबीयांची उपस्थिती होती.
चौकट :
आई-वडिलांचे स्वप्न साकार
आई इंदिरा व वडील शंकर शेठ बुटाला हे चाफळ येथील प्रभू श्री रामाचे भक्त होते. ते नेहमी चाफळ येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी येत होते. येताना सोबत कुटुंबातील आम्हा सदस्यांनाही घेऊन येत असत. प्रभू श्रीराम मुळे आपल्या कुटुंबाचा उद्धार झाल्याची भावना आई-वडिलांच्या मनात होती. त्यामुळे या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी प्रभू श्रीरामास सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते आज खऱ्याअर्थाने सत्यात उतरल्याने आनंद होत आहे,’ अशा भावना उद्योगपती श्रीकांत बुटाला यांनी व्यक्त केली.
फोटो १३चाफळ-राम
कऱ्हाड येथील उद्योगपती श्रीकांत बुटाला यांनी चाफळ येथील राम मंदिरास हाच सोन्याचा मुकुट अर्पण केला. (छाया : हणमंत यादव)