ऊस वाहतूक वाहनांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:15+5:302021-02-05T09:09:15+5:30
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक वाहनेही रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे अरुंद रस्त्यांवर इतर ...

ऊस वाहतूक वाहनांचा अडथळा
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक वाहनेही रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे अरुंद रस्त्यांवर इतर वाहनांना अडथळा येत आहे.
जिल्ह्यात सध्या सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी या महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे वाहने जाण्यासाठी थोडाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्यातच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक वाहने रस्त्याने जाऊ लागली आहेत. परिणामी, काही ठिकाणी ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरच्या मागे इतर वाहनांना रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत सावकाश जावे लागत असल्याचे चित्र आहे. यामध्ये वाहनधारकांचा वेळ वाया जात आहे. असे चित्र सातारा ते पुसेगाव दरम्यानच्या रस्त्यावर अधिक करून पाहावयास मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही रस्त्यांवरही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
.......................................................
कांद्याचा दर टिकून
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. आठवडाबाजारातही कांदा ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळत आहे. सध्या कांद्याचे दर टिकून आहेत. त्याचबरोबर भाजीपाल्याचे दर काहीसे कमी झाले आहेत. वांगी, दोडका, कारली यांचा भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
....................................
शेतीसाठी अखंडित
वीजपुरवठ्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
माणमधील वरकुटे मलवडी परिसरातील शेतक-यांनी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा आदी पिके घेतली आहेत. सध्या ज्वारी, गहू पिकांना पाणी देण्यात येत आहे. भारनियमनाप्रमाणे वीज उपलब्धतेनुसार शेतकरी दिवसा तसेच रात्रीही पाणी देत आहे. मात्र, अनेकवेळा ट्रान्सफाॅर्मरमधील फ्यूज उडाल्याने वीज खंडित होते. त्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होतात. यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
.................................................