कवठे प्राथमिक शाळेत अज्ञातांकडून तोडफोड
By Admin | Updated: February 25, 2016 01:15 IST2016-02-25T01:08:17+5:302016-02-25T01:15:13+5:30
हजारोंचे नुकसान : भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कवठे प्राथमिक शाळेत अज्ञातांकडून तोडफोड
कवठे : वाई तालुक्यातील कवठे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे कवठेत खळबळ उडाली असून, शाळा प्रशासनाच्या वतीने भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कवठे येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेची इमारत ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारली आहे. शाळेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. या शाळेस अनेक थोरांनी भेटी दिल्या असून, परिसरातील सर्वांत मोठी व गुणवत्तेतसुद्धा नावाजलेली अशी ही शाळा आहे. सोमवारी पहाटे अज्ञातांकडून शाळेतील स्वच्छतागृहात दगड, विटा टाकून दारे तोडण्यात आली. तसेच शाळेच्या पाणीपुरवठा योजनेची पाईप, खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. या घटनेत शाळेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना उघडकीस येताच मुख्याध्यापकांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आली. अशा घटना वारंवार घडत असून, ग्रामसभेमध्येही असे प्रकार घडू नयेत, याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरीही असे प्रकार घडत राहिल्याने शालेय समितीने, तसेच ग्रामस्थांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. (वार्ताहर)