स्थुलतेला नाही शहरी, ग्रामीणचे बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:36+5:302021-09-04T04:45:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुळे घरातच राहण्याची सक्ती ओढवलेल्या लहानग्यांचे वजन कोविड काळात चांगलेच वाढले आहे. चुकीचा आहार, ...

स्थुलतेला नाही शहरी, ग्रामीणचे बांध
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे घरातच राहण्याची सक्ती ओढवलेल्या लहानग्यांचे वजन कोविड काळात चांगलेच वाढले आहे. चुकीचा आहार, बैठ्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडेही टुमटुमीत झालेल्या मुलांच्या तब्येतीची चिंता पालकांची डोकेदुखी झाली आहे. कोरोनाची चिंता बाजूला ठेवून मुलांना मैदानात पाठवणं हाच त्यावरील उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या काळात कुपोषण वाड्यापाड्यांवर जास्त झाल्याचं दिसतंय. याचं कारण मुलांना अपेक्षित प्रमाणात पोषण आहार मिळाला नाही. दीड ते पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. घरीच असलेल्या मुलांना ऑनलाईन शाळा आणि क्लासमुळे कुठं बाहेर पडता आलं नाही. ऑनलाईन सेशन झाले की दिवसभर मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागली. याचे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले. अनियंत्रित खाणे-पिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला. लठ्ठ झालेल्या मुलांमध्ये चिडचिडेपणा, अभ्यासाचा कंटाळा अशा सवयही त्यांना लागल्या आहेत.
चौकट :
२. कोरोनाच्या आड आळसाला प्रोत्साहन !
ज्यांना व्यायाम करायचा आहे, त्यांनी अगदी ४०० स्क्वेअर फूटच्या घरातही तो केला. पण कोरोनाच्या आड आळसाला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांची संख्याही वाढली आहे. मुलांसाठी आवश्यक योगासने, सूर्यनमस्कार यासह पायऱ्या चढ-उतार करणे, दोरीच्या उड्या मारणे, गल्लीत सायकल चालवणे हे व यासारखे अनेक व्यायाम प्रकार मुलांना करायला लावणं ही पालकांची जबाबदारी होती. पण शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडेही हातात मोबाईल आणि भिंतीवर टीव्ही दिसू लागल्याने बाहेर पडण्याची मुलांची इच्छा झाली नाही आणि पालकांनीही त्याकडे कानाडोळाच केला.
३. कारणे काय?
ऑनलाईन क्लासमुळे मुलांचे बाहेर फिरणं आणि खेळणं दोन्ही बंद झाले आहे. काहीच हॅपनिंग नाही म्हणून मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ देणं ही अघोरी पध्दत पालकांनी अवलंबली. यामुळे मुलांची स्थुलता अनियंत्रितपणे वाढू लागली.
- डॉ. दीपक थोरात, बालरोगतज्ज्ञ
अनेक कुटुंबांमध्ये फ्रेश नाष्टा हद्दपार झाला आहे. जंक किंवा बेकरी फुड सकाळीच खाल्ल्याने त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहेत. मुलं बाहेर पडत नाहीत, म्हणून ती स्थूल झाली हे म्हणणं चुकीचं आहे. कारण घरातच शंभर पावलं चालून आणि पाच सूर्यनमस्कार करूनही आरोग्य जपता येते.
- वैद्य स्वप्नील जोशी
पालकांचीही चिंता वाढली
आम्ही राहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये खेळाचं मैदान नाही. पार्किंगमध्ये जेवढी जागा आहे तेवढ्याच जागेत मुलं खेळतात. लॉकडाऊनमध्ये सगळेच घरी असल्याने पार्किंगमध्येही खेळायला संधी नव्हती. घरात, बाल्कनीत बसण्यापलिकडे मुलांना कुठंच बाहेर पाठवता आलं नाही. त्यामुळे मुलं इतकी स्थूल झाली आहेत की आपल्या शरिराचीच त्यांना लाज वाटू लागली आहे.
- अंजली चव्हाण, आयटी अभियंता
४. यामुळे झालं कुपोषण
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जात होता. त्यामुळे त्यांच्या वाट्याचं पूर्ण अन्न रोजच्या रोज त्यांना मिळत होते. कोरोना वाढल्यानंतर शासनाने विद्यार्थ्यांचा पोषण आहार घरी पोहोच करण्याचे आदेश काढले. त्यामुळे महिना-दोन महिन्यांचा आहार घरी नेऊन देण्यात आला. मुलांच्या पोषणाच्या विचाराने घरी पोहोचवलेला हा आहार अवघ्या कुटुंबाने फस्त केला. त्याचा परिणाम म्हणूनही कुपोषण वाढले आहे.
५. यामुळे झालं अतिपोषण
मुलं खात नाहीत या सबबीखाली दुकानांच्या काऊंटरवर लटकणारी पाकिटं घरी येऊ लागली. घराबाहेर न पडलेलं मुलंही पाकिटातील खाऊ खाण्यासाठी दंगा करतात, कारण त्याच्या जिभेला त्यात वापरलेल्या मिठाचे व्यसन लागते. हे चटपटीत खाणं मुलांना इतकं आवडतं की, घरी केलेली पोळी-भाजी त्यांना बेचव लागते. पाणी शोषून ते साठवून ठेवणं हा मिठाचा गुणधर्म आहे. जंक फूड खाण्याने आणि शारीरिक हालचाली न करण्याने अतिपोषण होते.
......................