पोषण आहाराचा तांदूळ अडगळीत !
By Admin | Updated: January 19, 2015 00:26 IST2015-01-18T22:28:21+5:302015-01-19T00:26:08+5:30
वरकुटे-मलवडी : जिल्हा परिषद शाळेतील प्रकार; ग्रामस्थांत चर्चा सुरू

पोषण आहाराचा तांदूळ अडगळीत !
वरकुटे - मलवडी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा तांदूळ व इतर साहित्य अडगळीच्या खोलीत आढळून आले. यामुळे ग्रामस्थामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, वरकुटे-मलवडी, ता. माण येथील प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी नऊला शालेय व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शाळेतील प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांविषयी चर्चा करण्यात आली. नवीनच तयार झालेल्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सुरेखा पिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीने पोषण आहार ज्या खोलीत ठेवला आहे. त्या खोलीतील शिल्लक स्टॉकची पाहणी केली. यावेळी इतर शाळेतील खोल्यांची पाहणी केली असता एका खोलीत अडगळीच्या ठिकाणी दोन क्विंटल पन्नास किलो तांदूळ, दोन किलो हळदीच्या पाच पिशव्या आणि अर्धा किलोच्या सात पिशव्या, मोहरी पाव किलोच्या पाच पुड्या, पन्नास किलो हरभरा, गोडतेलाच्या दहा पिशव्या आदी साहित्य आढळून आले. यासंबंधी समितीने मुख्याध्यापिकांना विचारणा केली.
एका खोलीत अडगळीच्या ठिकाणी मुलांचा शालेय पोषण आहार शिल्लक आढळून आल्याने ग्रामस्थामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. समितीने खोलीत आढळून आलेल्या साहित्यांचा पंचनामा केला आहे.
माण तालुका गट शिक्षण अधिकारी वामन जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत हा प्रकार गैर नसावा, तरीही याबाबत चौकशी करू, असे सांगितले. (वार्ताहर)