नुनेच्या चित्राची अमेरिकन स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 23:33 IST2016-04-15T22:08:26+5:302016-04-15T23:33:57+5:30
प्रमोद कुर्लेकर यांचा गौरव : अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निमंत्रण

नुनेच्या चित्राची अमेरिकन स्पर्धेसाठी निवड
सातारा : अमेरिकेत भरलेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून आलेल्या २ हजार ५३९ चित्रांमधून सातारा तालुक्यातील नुने येथील चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. यामुळे साताऱ्याची कला साता समुद्रापार सादर करण्याची संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.अमेरिकेतील व्हर्जेनिया येथे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या अडीच हजार चित्रांमधून प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. कुर्लेकर यांनी सादर केलेले चित्र ग्रामीण भागाशी नाते जोडणारे आहे.नुने येथील चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांनी सांगली येथील कला विश्व महाविद्यालयात जी. डी. आर्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर वासुदेव कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणार प्रज्ञा इन्स्टिट्यूट आॅफ फाईन आर्ट, श्री आमदार म्युट एज्युकेशन कॉन्सिल बेंगलोरची शिष्यवृत्ती मिळाली.
कुर्लेकर यांना आत्तापर्यंत सोळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई येथील जहाँगिर आर्ट गॅलरी, नेहरी सेंटर आर्ट गॅलरीमध्ये आत्तापर्यंत चार वेळा प्रदर्शन भरवले आहे. (प्रतिनिधी)
आशा भोसलेंकडून कलेला भरभरून दाद
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या ८० व्या वाढदिनी प्रमोद कुर्लेकर यांनी आशा भोसलेंचे चित्र काढले होते. हे चित्र पाहून दस्तूरखुद्द आशा भोसलेंनी दाद दिली होती. ‘हे चित्र पाहिल्यावर मी स्वत:ला आरशातच पाहत आहे, असे वाटते,’ अशा शब्दात कौतुक केले होते.