जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:11+5:302021-05-22T04:36:11+5:30
सातारा : जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार ...

जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर..
सातारा : जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळालेला आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मोहिमेला वेग येणार आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमार्बीड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयांत ही सुविधा सुरू झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.
एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येऊ लागली. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे. आता फक्त ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे ठरविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात मोहीम सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रात ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात.
जिल्ह्याला मागील काही दिवसांत अवघ्या तीन वेळाच लस मिळालेली आहे; पण मिळालेल्या डोसची संख्याही कमी आहे. त्यामुळे लसीकरणात खंड पडत आहे. काही केंद्रे तर अनेक दिवस बंद असतात. यामुळे दूरवरच्या नागरिकांना हेलपाटा बसत आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. तरच लसीकरण मोहीम वेग घेऊ शकते.
पॉइंटर :
- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले कोरोना डोस ६,९९,२६०
- लसीकरण झाले ६,९३,६५२
- ज्येष्ठ नागरिक प्रथम डोस २,४८,९६७
- ज्येष्ठ नागरिक दुसरा डोस ४८१३८
- ४५ ते ५९ वयोगट पहिला डोस २,३८,०७४
- दुसरा डोस २८,४८९
..................