सात महिन्यांतील रुग्णसंख्या एकट्या एप्रिलमध्येच नोंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:12+5:302021-05-05T05:03:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असून एकट्या एप्रिल महिन्यातच सुरुवातीच्या सात महिन्यांतील ...

The number of patients in seven months was recorded in April alone ... | सात महिन्यांतील रुग्णसंख्या एकट्या एप्रिलमध्येच नोंद...

सात महिन्यांतील रुग्णसंख्या एकट्या एप्रिलमध्येच नोंद...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असून एकट्या एप्रिल महिन्यातच सुरुवातीच्या सात महिन्यांतील रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. गेल्यावर्षी मार्च ते सप्टेंबरदरम्यान जवळपास ३७ हजारांवर रुग्ण झाले होते. तर, आता एप्रिलमध्येच ३७२१८ नवीन बाधित नोंदले आहेत. तर तब्बल ५८६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंतचा हा एका महिन्यातील उच्चांक ठरला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही कोरोनाबाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्यमुखी पडणा-यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले. मात्र, जानेवारीपर्यंत स्थिती चांगली होती. फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. तर मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सुरू झाली.

एप्रिल या एकाच महिन्यात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले. ३७ हजार २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी गेल्यावर्षी मार्चपासून सप्टेंबरपर्यंत ३७ हजारांवर रुग्ण जिल्ह्यात आढळले होते. सात महिन्यांतील बाधित आता एकाच महिन्यात स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १ लाखांवर पोहोचली. तर एप्रिलमध्ये तब्बल ५८६ जणांचा कोरोनाने बळी गेला. तर २२ हजार जणच कोरोनामुक्त झाले आहेत. एप्रिलमधील कोरोनाची स्थिती भयावह असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर नागरिकांतही भीतीचे वातावरण आणखी गडद झाले आहे. यामुळे लोकांवरच आणखी खबरदारी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना स्थिती भयानक होत असून रुग्णांचे जीव जाऊ लागले आहेत. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचीही उपलब्धता कमी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग काम करत असले तरी लोकप्रतिनिधींचा पुढाकार वाढणे गरजेचे आहे, अशीच भावना लोकांतून पुढे येत आहे.

चौकट :

ऑक्टोबर ते मार्चपर्यंतची कोरोना आकडेवारी...

- गेल्यावर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली होती. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता.

-डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

- जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असले तरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते.

- फेब्रुवारी महिन्यात २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता जवळपास ११०० नवीन रुग्णांची भर पडली. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले. तर १ हजार ८५५ जण बरे झाले.

- मार्च महिन्यात कोरोनाचे नवीन ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यापेक्षा १५ ने मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली. तर १ हजार २२३ जण कोरोनामुक्त झाले होते.

.................................................................

Web Title: The number of patients in seven months was recorded in April alone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.