रुग्णांची संख्या शेकड्यात !
By Admin | Updated: December 1, 2014 00:22 IST2014-11-30T21:16:35+5:302014-12-01T00:22:15+5:30
बावधन : काविळीबाबत उपाययोजना नसल्याने ग्रामस्थांत नाराजी

रुग्णांची संख्या शेकड्यात !
बावधन : दूषित पाण्यामुळे बावधन परिसरात पंधरा दिवसांत काविळी झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून म्हणाव्या त्याप्रमाणात उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागानेही याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या वाई तालुक्याला बावधन गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु शुध्दीकरण प्रक्रिया करणारा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत आहे. पाण्यामध्ये टी.सी.एल. पावडर टाकून ते पिण्यासाठी वापरले जाते. परंतु ते सुध्दा योग्य प्रमाणात टाकले गेले नसल्याने अनेकवेळा तपासणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामसभेत दूषित पाण्यासंबंधी अनेकवेळा वादळी चर्चा झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष त्याबाबत कसलीही कार्यवाही झाली नसल्याचे काविळ झालेल्या रुग्णांच्या संख्येवरून उघड झाले आहे.
महिला, पुरुष, युवक, वृद्ध नागरिकांना दूषित पाणी पिल्याने काविळीची लागण झाली. सध्या बावधन आरोग्य केंद्र व वाईतील विविध खासगी रुग्णालयात ग्रामस्थ उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच ग्रामपंचायत उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आरोग्य विभागाकडे संपर्क साधला असता काविळीचे रुग्ण आढळून आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यापूर्वीही अतिसार, उलट्या, जुलाब व पोटाचे विकार आढळून आल्यानंतर पाण्याच्या स्वच्छतेबाबत सावधगिरी बाळगण्याचे लेखीपत्राद्वारे कळविले होते, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)
आरोग्य विभाग
जागा होणार का ?
बावधन येथे दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही याकडे संबंधितांनी म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य विभाग जागा होणार का, असा प्रश्न आहे.