आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार
By Admin | Updated: August 3, 2014 01:53 IST2014-08-03T01:12:23+5:302014-08-03T01:53:58+5:30
सातारा पालिका : प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी

आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार
सातारा : ‘नगरपालिकेच्या आस्थापनेवर असणारी सफाई कर्मचाऱ्यांची २३ पदे पुनर्जीवित करण्याच्या सातारा पालिकेच्या प्रस्तावाला नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी १ आॅगस्ट रोजी मंजुरी दिली,’ अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सारस यांनी दिली.
पाच ते सहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत नगराध्यक्ष सचिन सारस व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दि. २२ जुलै रोजी आयुक्त भापकर यांची भेट घेतली होती. ही पदे पुनर्जीवित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी या बैठकीत पटवून सांगितले.
ही सर्व चर्चा ऐकल्यानंतर आयुक्त डॉ. भापकर यांनी नगरपरिषदेच्या स्नेहसंमेलनाला येताना ‘प्रस्ताव मंजुरीचे पत्र घेऊन येतो,’ असा शब्द दिला होता. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे आयुक्त डॉ. भापकर या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना ई-मेल द्वारे हा प्रस्ताव मंजुरीचे पत्र पाठविले आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्याने नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची २३ पदे वारसा हक्काने भरण्यात येतील. शहराच्या स्वच्छतेच्या कामाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी खा. उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केल्याचे सारस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)