झेडपीमधील कोरोनाबाधित कर्मचारी संख्या ८०० जवळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:31+5:302021-02-06T05:15:31+5:30

सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून, बाधित आकडा ७७१ झाला आहे, तर ७३८ जणांनी कोरोनावर ...

The number of coronated employees in ZP is close to 800 ... | झेडपीमधील कोरोनाबाधित कर्मचारी संख्या ८०० जवळ...

झेडपीमधील कोरोनाबाधित कर्मचारी संख्या ८०० जवळ...

सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून, बाधित आकडा ७७१ झाला आहे, तर ७३८ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला; तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात प्रथम कोरोना रुग्ण सापडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोनाबाधित झाले आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७७१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा तालुक्यात कार्यरत १३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये १०९, कोरेगाव तालुका १३१, खटाव ६९, खंडाळा तालुका ३७, जावळी २७, पाटण तालुक्यात ८३, फलटण ४९, महाबळेश्वर ३३, माण ४१ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे; तर कोरोनाने आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. पाटण तालुक्यातील तिघांचा, तर सातारा, कोरेगाव, जावळी आणि फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. माण तालुक्यातीलही एका कर्मचाऱ्याचाही कोरोनाने बळी गेला आहे.

चौकट :

सातारा तालुक्यातील १३३ कोरोनामुक्त...

जिल्हा परिषदेच्या ७७१ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७३८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १२४ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३३, पाटण ८०, कऱ्हाड १०९, महाबळेश्वर ३३, खटाव ६१, वाई ५६, फलटण ४६, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

................................................................

Web Title: The number of coronated employees in ZP is close to 800 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.