आता आयुष्यात कधी कांदा नाय लावणार !
By Admin | Updated: March 24, 2016 23:43 IST2016-03-24T22:45:57+5:302016-03-24T23:43:48+5:30
देऊरमधील शेतकऱ्यांचा निर्धार : गावात यंदा विक्रमी उत्पादन; पण दर नाही

आता आयुष्यात कधी कांदा नाय लावणार !
वाठार स्टेशन : गेल्या वर्षी कांदा उत्पादकांना एकरात लाखोंचा फायदा झाला. या आशेपायी यंदा कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात साडेसात हजार टन कांद्याचे उत्पादन झाले आहे. मात्र सध्या बाजारपेठेत दर नसल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. आता यापुढे आयुष्यात कधी कांदा लावणार नाही, असा निर्धार देऊरमधील शेतकऱ्यांनी केला आहे. कमी पाण्यावर हमखास उत्पन्न मिळवून देणारे हुकमी पीक अशी ओळख असलेले कांदा पीक आतापर्यंत मर्यादित प्रमाणात घेतले जात होते, त्यामुळे या पिकाला नेहमीच चांगला बाजारभाव मिळत होता. काही वेळेला तर या कांद्याने अनेकांना रडवण्याचे काम केले, मात्र आता हा कांदा शेतकऱ्यालाच रडवू लागला आहे. कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक कांदा उत्पादक गाव म्हणून तळिये गावचे नाव घेतले जाते. या गावानंतर आता शेजारील देऊर गावानेही कांदा उत्पादनात आघाडी घेतली. या गावात आजपर्यंत जवळपास साडेसात हजार टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न झाले आहे. उत्पादित केलेला कांदा साठवणूक करुन भविष्यात तरी दर मिळेल, याच आशेवर हा शेतकरी विसंबून राहिला आहे. साठवणूक केलेला कांदाही एक ते दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. त्यानंतर मात्र कांदा खराब होण्याचा धोका असल्यामुळे मिळेल त्या दरात विक्री करण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्यायच राहणार नसल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. चालू वर्षी कांद्याची लॉटरी खेळणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची चांगली जोपासणा केल्याने कांद्याची एकरी उत्पादनात वाढ झाली. उत्पादनवाढीसाठी नवनवीन किमती औषधांचाही वापर शेतकऱ्यांनी केल्याने हा कांदा चांगल्या प्रमाणात पोसला गेला. मात्र कोणत्याच शेतीमालास निश्चित हमीभाव नसल्याने कांदा उत्पादक नाराज झाला आहे. (वार्ताहर) शेतकरी आर्थिक अडचणीत साधारण एक एकर कांदा उत्पादित करण्यासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च येत असल्याने आज लाखो रुपये खर्च करुन वाढवलेल्या कांद्यास दरच नसल्याने हा कांदा उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा पोषक वातावरण मिळाल्याने कांद्याचे उत्पन्न वाढले. कांद्याची विक्री ही पुणे, साताराबरोबरच सर्वात जास्त प्रमाणात बेंगलोर याठिकाणी केली जाते. मात्र या सर्वच ठिकाणी कांद्याची आवक वाढल्याने दर ठासळले आहेत. यासाठी कांदा साठवून दर आल्यानंतर तो विक्रीसाठी खुला करावा लागणार आहे - मनोज कदम, शेतकरी, देऊर