पानटपरीत आता स्टेशनरीचे साहित्य!
By Admin | Updated: February 12, 2016 23:44 IST2016-02-12T21:42:29+5:302016-02-12T23:44:10+5:30
बदलते स्वरूप : शासनाच्या बदलत्या धोरणांचा स्वीकार करत व्यावसायिक वाटचाल

पानटपरीत आता स्टेशनरीचे साहित्य!
सातारा : जेवण केल्यानंतर पचनासाठी पान खाण्याची पद्धत होती. त्यामुळे पूर्वी पानटपरीवर खास पानासाठी गर्दी होत होती; मध्यंतरी पानाच्या जागी गुटखा आला अन् टपऱ्यांची संख्याही वाढली. शासनाने गुटखा बंदी केल्यामुळे याच टपऱ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. गुटख्याची जागा चॉकलेट-बिस्किटाने घेतली आहे. तर शहरातील अनेक पान टपऱ्यांमध्ये अगदी स्टेशनरीसुद्धा मिळू लागली आहे. खाऊच्या पानाचा पचनासाठी फायदा होतो, यासाठी जुनी जाणती मंडळी आजही जेवण करून पानाचा विडा खातात, तर याच खाऊच्या पानासाठी पानपट्टीही मोठ्या प्रमाणात चालत असत. बनारस पान, साधा पान, मसाला पान अशा ठराविक पानांचे प्रकार मिळत होते; परंतु अलीकडील काही वर्षांत गुटख्याने प्रवेश केल्यानंतर तरुण वर्ग हा गुटख्याच्या आधीन झाला आणि बघता-बघता पानपट्टीच्या नावाखाली गुटखाविक्री होऊ लागली. गुटख्याला वाढती मागणीमुळे अनेकजण पानपट्टी उभारून अगदी गल्लीबोळात देखील या टपऱ्या दिसू लागल्या; परंतु मागील वर्षापासून राज्य शासनाने गुटखा बंदी घातल्याने अनेक पानपट्ट्या बंद पडण्याच्या मार्गावर आल्या. पानपट्टीतील जास्त खपणाऱ्या गुटख्यावरच बंदी आल्याने टपऱ्या चालत नसल्याचे अनेकांनी विविध प्रकारच्या सुपाऱ्या, बडीशेप, गोळ्या-बिस्किटे आणून विक्री करू लागले आहेत. तर काहीजणांनी थंडपेय सुरू केले आहे. गुटखा बंदीमुळे आता मसाले पानाला मागणी वाढली आहे तर छोट्या-मोठ्या पानपट्टीधारकांनी शालेय वस्तू, थंड पेय, पेपर स्टॉल, भाजीपाला, खेळणी, कटलरीचे साहित्य ठेवू लागले आहेत. तर शाळेजवळ असणारे पानपट्टीमध्ये चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी) बदल स्वीकारले! शहरात रस्त्याकडेला असलेल्या या पानटपरींमध्ये एकेकाळी गुटख्यांच्या पुड्यांचा पाऊस होता. शासनाने बंदी आणल्यानंतर बहुतांश व्यापाऱ्यांनी गुटखा विक्री बंद केली. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गुटख्यावर बंदी आणल्यानंतर आता दोन वेळचे भागवायचे कसे? असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे होता. या संकटावर मार्ग काढत अनेकांनी कंगव्यापासून प्लास्टिकच्या पट्टीपर्यंत अनेक स्टेशनरीच्या वस्तु आपल्या टपरीत विक्रीस ठेवल्या. गुटख्या इतकं उत्पन्न मिळत नसले तरीही दोन वेळचे भागेल इतके पैसे तर त्यातून मिळत आहेत. शासनाच्या धोरणानुसार विक्री करण्याच्या मालात वैविधता आणून या व्यावसायिकांनी प्रामाणिकपणा दाखविला आहे.