आता २०० लोकांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:31+5:302021-08-18T04:45:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नबंधनात अडकण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. ...

Now in the presence of 200 people | आता २०० लोकांच्या उपस्थितीत

आता २०० लोकांच्या उपस्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नबंधनात अडकण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. लग्नसोहळ्यासाठी २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी मिळाल्याने आता लग्नाचे बार धडाक्यात उडणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वधू-वर मंडळींसह मंडप, वाजंत्री अन्‌ मंगल कार्यालय चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाचा फटका जसा उद्योग, व्यवसायांना बसला तसाच लग्नसोहळ्यांवरदेखील कोरोनाने गंडांतर आणले. लग्नाला नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा, कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका, विस्कटलेली आर्थिक गणिते अशा अनेक कारणांमुळे मुहूर्त असूनही अनेकांना लग्नाचा बार उडवता आला नाही. याचा फटका मंगल कार्यालय चालक, वाजंत्री, केटरर्स, फोटोग्राफर अशा सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनादेखील बसला. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने लग्न सोहळ्यासाठी ५० ऐवजी आता २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे, तर लग्न बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये असेल तर १०० व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांनंतर शासनाने हा निर्णय घेतल्याने व्यावसायिकांसह वधू-वरांकडील मंडळींनाही मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा पै-पाहुण्यांचे आशीर्वाद घेऊन रेशीमगाठीत अडकण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

(कोट)

मंगल कार्यालयात उत्साहाला उधाण

मंगल कार्यालय बंद असल्याने आमच्यावर कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. आता शासनाने दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी दिल्याने आमचे आर्थिक संकट दूर होईल.

- विशाल यादव, व्यावसायिक

कोट)

कोरोनामुळे लग्न सोहळ्याचे चित्रच बदलून गेले. जिथे पाचशे-हजार लोक लग्नाला यायचे तिथे केवळ वीस-पंचवीस लोकांमध्ये लग्न होऊ लागले. आम्ही शासन नियमांचे पालन करून लग्न सोहळे पार पाडणार आहोत.

- प्रशांत जगदाळे, मंडप व्यावसायिक

(कोट)

रोजी सुरू झाल्याने बँडवालेही जोरात

आम्हा वाजंत्रींवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली. वर्षभरात केवळ पंधरा-वीस सुपाऱ्या मिळत होत्या. आता एकही मिळत नाही. इथून पुढे परिस्थिती बदलेल अशी आशा आहे.

- गौरव जाधव, सातारा

(कोट)

आमच्या पथकात पंधरा-वीस मुले आहेत. सण-उत्सव, लग्न, धार्मिक कार्यक्रमात आम्ही वाजविण्याचे काम करतो. बऱ्याच दिवसांनंतर हाताला काम मिळणार असल्याचा आनंद होत आहे.

- विनायक पवार, सातारा

(चौकट)

लग्न समारंभासाठी या आहेत अटी

मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के; परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

लॉन : लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के; परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादित असेल. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

(चौकट)

लग्नाच्या तारखा

लग्नाचे मुहूर्त २०२१

ऑगस्ट : १८, २०, २१, २५, २६, २७, ३०,३१

सप्टेंबर : १, ८, १६, १७

ऑक्टोबर : ८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०

नोव्हेंबर : ८, ९, १०, १२, १६, २०, २१, २९, ३०

डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९

(कोट)

कोरोनामुळे यावर्षी विवाह सोहळ्यांचे प्रमाण कमी झाले. यंदा ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत विवाहाचे अनेक मुहूर्त आहेत. अटी शिथिल झाल्याने पुन्हा एकदा विवाह सोहळ्यांचे प्रमाण वाढेल, असे वाटते.

- संदेश वाडेकर, गुरव

Web Title: Now in the presence of 200 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.