ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता आॅनलाईन अर्ज
By Admin | Updated: December 2, 2014 00:22 IST2014-12-01T23:00:00+5:302014-12-02T00:22:59+5:30
आठ ग्रामपंचायतींसाठी २३ रोजी मतदान, मतमोजणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता आॅनलाईन अर्ज
सातारा : जिल्ह्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आठ ग्रामपंचायतीसाठी तसेच साठ ग्रामपंचायतंच्या पोटनिवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच विविध कारणाने रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि साठ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील आष्टे, पाटणमधील कोदळ, खंडाळा तालुक्यातील सालव, दापकेघर, गोळेगाव, देवघर, फलटण तालुक्यातील परहर आणि खटाव तालुक्यातील एका अशा आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. २९ नोव्हेंबर २०१४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. हा निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खालील सूचनांचे पालक करण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांची अर्ज आता आॅनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत मतदान व मतमोजणी एकाचदिवशी म्हणजेच मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी होणार आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्राबरोबर जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणी समितीने दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आवश्यक आहे. (प्रतिनिधी)