आता मंत्रीच करतील आंदोलन !

By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:41+5:302016-04-03T03:49:41+5:30

पालकमंत्र्यांचा इशारा : दुष्काळ बैठकीत कागदी घोडे; राष्ट्रवादीचे आमदारही प्रचंड संतप्त

Now the minister will do the agitation! | आता मंत्रीच करतील आंदोलन !

आता मंत्रीच करतील आंदोलन !

सातारा : ‘राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच साताऱ्यालाही दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस झालेल्या पश्चिमेकडील तालुक्यांमधूनही पिण्याचे टँकर, चारा छावणी तसेच नळ पाणी योजना, विंधन विहिरींची मागणी आहे. मात्र, कागदी घोडे नाचवत प्रस्ताव दडपून ठेवले जात आहेत. वास्तविक दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच अधिक सजगपणे काम करायला हवे होते; पण तसे घडताना दिसत नसल्याने लोकप्रतिनिधींसह सरकारमधील मंत्र्यांनाही आता आंदोलनात उतरावे लागेल,’ असा संतापजनक इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
पालकमंत्र्यांनी शनिवारी नियोजन भवनात जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे उपस्थित होते.
या बैठकीत साताऱ्यातील आमदार पोटतिडकीने दुष्काळी उपाययोजनांची मागणी करत असताना जिल्ह्यातील अधिकारी मात्र दुष्काळ नाही हेच दाखविण्याचा आटापिटा करताना पाहायला मिळत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. आनंदराव पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या आणि आग्रही मते मांडली. गेल्या दीड महिन्यापासून चारा छावण्या मागण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत, यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. चाऱ्याबाबतचे प्रशासनाकडील आकडे फसवे आहेत. प्रत्यक्ष सर्व्हे करून गरज असलेल्या तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा, अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. आ. शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांनी गोरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरही आमदारांनी जोरदार ताशेरे ओढले. नळपाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठवूनही ते कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांच्याकडून अडविले जात आहेत. विंधन विहिरींची मागणी असताना भूजल विभाग टाळाटाळ करत आहे. दुष्काळाबाबत या विभागातील अधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही, असे आरोप आमदारांनी केले. तसेच पालकमंत्र्यांनी लक्ष घालून पुन्हा बैठक बोलाविण्याची मागणी केली.
उद्या मुंबईत बैठक
पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सर्व विभागांनी एकत्र बसून कागदपत्रांची पूर्तता करावी. उद्या, सोमवारी मुंबईत सर्व आमदार, जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे.
...सात दिवसांत टँकर अन् छावण्या
माण-खटाव तालुक्यांतील तीव्र दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या दोन तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. दरम्यान, मागणीनंतर सात दिवसांत टँकर पुरवठा सुरू करा. दुष्काळाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Now the minister will do the agitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.